शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
548

मुंबई, दि.१ (पीसीबी) – राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख, तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत असंही अजित पवार यांनी सांगितले आहे.

याआधी अजित पवार यांनी ११ हजार ४६८ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. १५ मार्च रोजी अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली होती की, “महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. १३ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे”.

अजित पवार यांनी आणखी एक टि्वट करून कोणत्या बँकांमध्ये किती रक्कम जमा केली, हेही स्पष्ट केलं होतं. “जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४ हजार ४४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ५२७५.८६ कोटींची तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ७ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांच्या खात्यात ६१९२.५० कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे,” असे त्यांनी सांगितलं होतं.