डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार

0
494

अमेरिका,दि.११(पीसीबी) – आज व्हाइट हाऊसबाहेर गोळीबाराची घटना घडली यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु होती. बाहेर गोळीबार होताच तिथे उपस्थित असलेल्या सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटसनी ट्रम्प यांना या घटनेची माहिती दिली व त्यांना व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षातून बाहेर नेले.

व्हाइट हाऊसच्या सुरक्षा रक्षकांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ट्रम्प लगेचच पुन्हा मीडिया रुममध्ये आले व बाहेर गोळीबार झाल्याची माहिती दिली. सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेले आहे. संशयित शस्त्र सज्ज असल्याची आपल्याला माहिती मिळालीय असे ट्रम्प यांनी सांगितले.

त्यांनी सिक्रेट सर्व्हीसने तात्काळ उचललेल्या पावलांबद्दल त्यांचे कौतुक केले. पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर काही मिनिटात ट्रम्प यांना पत्रकार कक्षातून बाहेर नेण्यात आले. पत्रकार परिषद मध्येच रोखण्यामागे काय कारण आहे? त्याबद्दल कुठलीही माहिती लगेच देण्यात आली नव्हती. नंतर ट्रम्प यांनी स्वत:च गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली.

दरम्यान “व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झालाय. पण परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणालातरी रुग्णालयात घेऊन गेले आहेत. त्या व्यक्तीची स्थिती कशी आहे, ते मला माहित नाही” असे ट्रम्प म्हणाले.