डब्ल्यूएचओ च्या अंदाजावर भारताचा आक्षेप

0
228

न्यूयॉर्क, दि. ६ (पीसीबी) : अधिकृत आकडेवारी उपलब्ध असतानाही करोना महासाथीशी संलग्न मृत्यूंचे अतिरिक्त अंदाज दर्शवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या गणितीय प्रारूपाच्या वापरावर भारताने गुरुवारी जोरदार आक्षेप घेतला. यासाठी वापरण्यात आलेले प्रारूप आणि माहिती गोळा करण्यासाठी वापरलेली पद्धत संशयास्पद असल्याचे भारताने सांगितले.

करोना विषाणूमुळे किंवा आरोग्य यंत्रणेवरील त्याच्या परिणामामुळे गेल्या दोन वर्षांत सुमारे दीड कोटी लोक मरण पावल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गुरुवारी जारी केलेल्या अहवालात व्यक्त केला. ६० लाख मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा दुपटीहून अधिक आहे. यापैकी बहुतांश मृत्यू आग्नेय आशिया, युरोप व अमेरिका येथे झाले आहेत.

गणितीय प्रारूपांच्या आधारे मृत्यूंचे अतिरिक्त अंदाज (एक्सेस मॉर्टलिटी एस्टिमेट्स) वर्तवण्यासाठी डब्ल्यूएचओने स्वीकारलेल्या पद्धतीवर भारताने सातत्याने आक्षेप घेतला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले. ‘प्रक्रिया, पद्धत आणि या प्रारूपीय अभ्यासाचे फलित यांवरील भारताच्या आक्षेपानंतरही डब्ल्यूएचओने भारताच्या शंकांचे पुरेसे निरसन न करता मृत्यूंचे अतिरिक्त अंदाज जारी केले आहेत,’ असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.