ठाणे, पालघर, नाशिक, पिंपरी-चिंचवडमधील कोकणवासियांना टोलमाफी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0
460

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमानी, कोकणवासीयांना राज्य सरकारने सणाची भेट दिली आहे. ठाणे, पालघर, नाशिक हे जिल्हे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातून कोकणात  जाणाऱ्या  कोकणवासियांना  पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे  आणि  पुणे-कोल्हापूर महामार्गावर  टोल माफी देण्यात आली आहे.

याबाबतचा निर्णय आज ( बुधवारी) झालेल्या  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला.  या मार्गांवरील टोल नाक्यांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून जाणाऱ्या कोकणवासियांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि  पुणे-बंगळुरु महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर टप्प्यात टोल माफीचा निर्णय यापूर्वी  घेण्यात आला होता.   मात्र,  अशी सवलत ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, नाशिक जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना देण्यात आली नव्हती.

यामुळे या परिसरातील  कोकणवासियांनाही  टोलमाफी मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे  केली होती. याची दखल घेत  राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत टोलमाफीची निर्णय घेऊन संबंधितांना सूचना दिल्या आहेत.