आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे, नेत्यांना पक्षात घेताना पावडरने धुवून घेतो- रावसाहेब दानवे

0
683

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला केला होता. सुळे यांच्या आरोपाला भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो, असे दानवे म्हणाले.

२०१४मध्ये सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्यांच्यावर आरोप केले होते. त्याच नेत्यांना भाजपामध्ये घेतले जात आहे. हे डागाळलेले नेते आता सत्ताधाऱ्यांना कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीन धुतले जाते, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. सुळे यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत उत्तर दिले होते. आमच्या वॉशिंग पावडर नाही, तर डॅशिंग रसायन आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी नाशिक येथील सभेत टीका केली होती. सर्वच रसायने चांगली नसतात. काही रसायने घातक असतात. त्यामुळे त्यापासून सावध राहायला हवे, असे सुळे म्हणाल्या होत्या.

मुख्यमंत्री फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यात सुरू असलेल्या वॉशिंग पावडरच्या वादात भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही उडी घेतली आहे. दानवे यांनी आपल्या शैली सुळे यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. दानवे म्हणाले, भाजपा हीच वॉशिंग मशीन आहे. कोणालाही पक्षात घेण्यापूर्वी आम्ही त्याला या मशीनमधून धुवून घेतो. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे, असा टोला दानवे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.