टीडीआर घोटाळ्याला मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद !!! – माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचा गौप्यस्फोट

0
232

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील वाकड मधील भूखंडावर समावेशक आरक्षणांतर्गत जो प्रकल्प राबविण्यात येत आहे त्यात प्रचंड मोठा म्हणजे अडिच हजार कोटींचा घोटाळा आहे. धक्कादायक बाब म्हणजे आयुक्त शेखर सिंह यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादानेच हा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने आयोजित या संयुक्त पत्रकार परिषदेत हे प्रकरण धसास लावण्याचा निर्धार सर्वांनी केला असून त्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाणार तसेच आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

मोरवाडी येथील घरोंदा हॉटेलमध्ये ओयिजत पत्रकार परिषदेला तीनही पक्षांचे नेते उपस्थित होते. माजी आमदार चाबुकस्वार यांच्याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, शहराध्यक्ष कैलास कदम आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गौतम चाबुकस्वार यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. त्यांनी थेट मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन या घोटाळ्याला त्यांचाच आशिर्वाद असल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या माध्यमातून मुख्यमंत्रीच या प्रकरणाचे मुख्यसूत्रधार असल्याचे चाबुकस्वार यांनी सुचित केले.

आपल्या निवेदनात गौतम चाबुकस्वार म्हणाले, नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे आणि त्यांचाच आशिर्वादाने हे सगळे सुरू आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह हे प्रशासक असून त्यांच्या माध्यमातूनच हा घोटाळा झाला. मात्र, या शहरातील जनता झोपलेली नाही, सर्व नागरिक जागृक आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे प्रकरण बाहेर काढले. आता त्यात चौकशी आणि संबंधीतांवर कारवाई केली नाही तर आम्ही सगळे मिळून तीव्र आंदोलन करणार आहोत. शहरातील अशाच प्रकारच्या अन्य आरक्षणांबाबत काय घडले त्याची यादीच प्रसिध्द करणार आहोत. भाजपने त्यांच्या पाच वर्षांच्या काळात अनेक घोटाळे केलेत, ते सगळे आम्ही लोकांसमोर ठेवणार आहोत. शहरातील नागरिकांचा कररुपी गोळा होणारा पैसा कोणालाही खाऊ देणार नाही, असा इशारा चाबुकस्वार यांनी यावेळी बोलताना दिला.

तीनही आमदार गप्प का –
शहरात दोन-अडिच हजार कोटींचा प्रचंड मोठा घोटाळा उघडकिस आलेला असताना तीनही आमदार या विषयावर एक शब्द बोलायला तयार नाहीत, ते गप्प का आहेत, असा सवाल चाबुकस्वार यांनी केला. आमदार गप्प असल्याने संशय बळावला आहे. आता नागरिकांच्या मनात शंका आहे की, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग आहे की काय. काही झाले तरी या संपूर्ण प्रकऱणाचा आम्ही छडा लावणार आहोत. प्रसंगी न्यायालयात जाणार आहोत. प्रशानाकडून न्याय मिळणार नाही पण त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन छेडू, धरणे करू पण हा प्रश्न धसास लावू.