“टागोरांप्रमाणे वाढविलेली दाढीही भाजपच्या उपयोगाला नाही; एवढ्या मोठ्या पराभवानंतर मोदी आपली दाढी कमी करणार?”

0
263

कोलकत्ता, दि.०३ (पीसीबी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता स्थापन करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. भाजपला लोकसभा निवडणुकीत तेथे 18 जागा मिळाल्याने भाजपचा विश्वास प्रचंड वाढला होता. आता पश्चिम बंगालमधील महत्वाची प्रतिके भाजपशी सुसंगत करून घेतली की विधानसभा निवडणुकीत भाजपला अच्छे दिन येतील, असा अंदाज होता. त्याची सुरवात मोदींनी लाॅकडाऊनपासून केली.

गेल्या वर्षी देशावरती कोरोनाचे सावट पसरले. आणि त्यामुळे लाॅकडाऊन झाला आणि त्यातून अनेक व्यवसायांना फटका बसला. केश कर्तनालयांकडे कोणी फिरकत नव्हते. मोदींनी या संधीचा फायदा घेतला आणि आपली दाढी ट्रिम करण्याचेच सोडून दिले. त्यांनी दाढी अशी वाढवली की छातीच्या खाली दिसू लागली. मोदी कोणतीही कृती ही विनाकारण करत नाही, असे अनेकांचे मत होते. मोदींच्या दाढी वाढविण्यामागे काहीतरी हेतू असेल तेव्हाच बोलले जाऊ लागले. काही दिवसांनी लक्षात आले हे तर मोदी महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या दाढीशी स्पर्धा करत आहेत. हे पश्चिम बंगालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होत असल्याची चर्चा रंगली. मोदी त्यावरच थांबले नाहीत तर रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखा पोषाखही ते बंगालच्या दौऱ्यावर असताना आवर्जून करू लागले.

त्यांचा काळ्या रंगातील कफनीतील फोटो तेव्हा सोशल मिडियात व्हायरल झाला होता. रवींद्रनाथ यांच्यासारखीच शाल ते पांघरू लागले. त्यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारने बंगालच्या वर्तनामपत्रात तेव्हा जाहिराती दिल्या. त्यातही मोदींचा दाढी वाढलेला फोटो हा रवींद्रनाथ टागोरांचेच अनुकरण करणारा असा होता. डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या त्या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणात `जय श्रीराम`च्या घोषणा देऊन अडथळे आणण्यात आले होते. त्यामुळे त्या कार्य़क्रम अर्धवट सोडून गेल्या होत्या. वाढलेल्या दाढीच्या रुपातच त्यांनी बंगालमध्ये 23 सभा घेतल्या. अधिकृत प्रचारसभा होण्याच्या आधीपण त्यांनी विविध कार्य़क्रमांच्या निमित्ताने बंगालमध्ये हजेरी लावली. या साऱ्यांमुळे बंगालमध्ये मोठ्या विजयाची भाजपला खात्री होती. प्रत्यक्षात भाजप विधानसभेतील जागांची तीन आकडी संख्याही पार करत नाही, अशी स्थिती आहे. केवळ 84 जागांवर भाजपला आघाडी राहिली आहे. याउलट तृणमूल काॅंग्रेस 204 जागांवर पुढे आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना हा पराभव धक्का देणारा आहे. इतकी वाताहत होईल, अशी त्यांची अपेक्षा नव्हती. त्यामुळे एवढ्या मोठ्या पराभवानंतर आता मोदी आपली दाढी कमी करणार का?, असा खोचक सवाल सोशल मिडियात विचारला जात आहे.