जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा. अन्यथा, जनता आपल्याला जोड्याने मारेल

0
701

मुंबई, दि.७ (पीसीबी)  – मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात एसआरए योजनेचा विकास करताना एमएमआर रिजनमध्येही क्लस्टरची योजना राबविली जाणार आहे. शिवाय, एमएमआर क्षेत्राचे वेगळे प्राधिकरण केले जाणार आहे. त्यामुळे या भागाचा विकास त्याच ठिकाणी होण्यास मदत होणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गुरुवारी उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘क्लस्टरच्या मागणीकरिता यापूर्वी आम्ही आंदोलने केली, बंद केले. आता सत्ता मिळाल्याने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा. अन्यथा, जनता आपल्याला जोड्याने मारेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पूर्वी आम्ही कधीतरी लपूनछपून भेटत होतो. मात्र, आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने उघडपणे भेटत आहोत. परंतु, पूर्वी जे उघडपणे भेटत होते, ते आता गायब झाले आहेत,’ असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.

ठाण्याचा झपाट्याने विकास करण्याकरिता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खूप कामे केली आहेत. त्यामुळे निवृत्तीपर्यंत त्यांना येथेच आयुक्तपदी ठेवा किंवा अन्य कोणते पद देऊन त्यांना ठाण्यात ठेवा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.