लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील ५९ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरूवात

0
527

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला आज (रविवार) सुरुवात झाली आहे.  देशातील सहा राज्ये व दिल्ली मिळून ५९ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. २०१४ साली भाजपने या ५९ पैकी ४५ जागा जिंकल्या होत्या.  मात्र यंदा भाजपसाठी या  मतदारसंघात  मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या वेळी तृणमूल काँग्रेसने ८, काँग्रेसने २, तर समाजवादी पक्ष व लोकजनशक्ती पक्ष यांनी प्रत्येकी १ जागा जिंकली होती.

या टप्प्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी, राधा मोहन सिंह, हर्षवर्धन, कृष्णपाल गुर्जर, राव इंदरजित सिंह, नरेंद्र सिंह तोमर, तसेच गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, निरहुआ, मनोज तिवारी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, विजेंदर सिंह, भूपिंदरसिंह हुडा व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे.

उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होत आहे. १०.१७ कोटी मतदार मतदानासाठी पात्र असून एकूण ९७९ उमेदवार रिंगणात आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यातील  लढतीमुळे भोपाळ मतदारसंघाने  सर्वांचे लक्ष वेधले आहे. राजधानी दिल्लीत भाजप, आप व काँग्रेस यांच्यात तिहेरी लढत होत आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजप व डावी आघाडी हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.