चिंचवडमध्ये विनाकारण दोन तरुणांना बेल्टने बेदम मारहाण

0
1413

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघालेल्या दोन तरुणांना तिघा जणांच्या टोळक्यांनी लाथा-बुक्क्या आणि बेल्टने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास साईबाबा मंदिराजवळ शिवनगरी, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी जखमी राकेश नवल पाटील (वय २१, रा. अवताडे निवास, साईबाबा मंदिराजवळ, शिवनगरी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिदानंद कांबळे, विजय जाधव, ऋषिकेश उत्तरेकर (तिघे रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश आणि त्यांचा मित्र संदीप पाटील हे दोघे रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचवड येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून घरी निघाले असता शिवनगरी येथील साईबाबा मंदिराजवळ आरोपी चिदानंद, विजय आणि ऋषिकेश या तिघांनी त्यांना अडवले. आणि कारण नसताना लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करत ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनघा शेवाळे तपास करत आहेत.