चाकणमध्ये तरुणाला सव्वा लाख रुपये असल्याचे भासवून दिले पांढरे कागद

0
794

चाकण, दि. २६ (पीसीबी) – गावी पैसे पाठवण्यासाठी एटीएमच्या रांगेत उभा असलेल्या एका तरुणाला तीन जणांनी मिळून ११ हजारांचा गंडा घातला. सुरुवातीला आरोपींनी रुमालात १ लाख २० हजार रुपये असल्याचे सांगून तो रुमाला त्या तरुणाकडे दिला. त्यानंतर तरुणाकडील रोख ११ हजार रुपये घेऊन पोबारा केला. रुमाल उघडल्यानंतर त्यामध्ये चक्क पांढरे कागद आढळले. ही घटना सोमवारी (दि. २५) सकाळी दहाच्या सुमारास चाकण गावात घडली.

याप्रकरणी दीपककुमार गोविंद गुप्ता (वय २०, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, प्रतापसिंग शंकरदीप राजपूत (वय ३८, रा. आधारवाडी, कल्याण, ठाणे), सतीश भगवान रणदिवे (वय २५, रा. बदलापूर, ठाणे), योगेश कडूबा सोनवणे (वय ६५, रा. उल्हासनगर, ठाणे) या तिघांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दीपककुमार हे गावी पैसे पाठवण्यासाठी चाकण गावातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरबाहेरील रांगेत उभे होते. त्यांच्या पुढे आरोपी प्रतापसिंग, सतीश आणि योगेश थांबले होते. आरोपींनी संगनमत करून त्यांच्या जवळ असलेल्या निळ्या काळ्या रंगाचा रुमालमध्ये १ लाख २० हजार रुपये असल्याचे दीपककुमार याला भासवले. त्या पैशांच्या बदल्यात आरोपींनी दीपककुमार यांच्याकडून ११ हजार रुपये रोख घेतले आणि पसार झाले. दीपक कुमार यांनी रुमाल उघडून बघितला असता त्यात पांढऱ्या रंगाचे कागद आढळून आले. त्यांनी चाकण पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.