चंद्रकांत पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची ऑफर; भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

0
455

पुणे, दि. २ (पीसीबी) – पुण्यातील कोथरूडमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची ऑफर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे, असा गौप्यस्फोट विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.

कोथरूड मतदारसंघातून आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  त्यानंतर मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या.  परंतु आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

आपण भाजपसोबतच राहणार आहे. चंद्रकांत पाटील यांना मोठ्या फरकाने निवडून आणू आणि पक्षविरोधी काम करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विश्वंभर चौधरी यांना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. परंतु त्यांनी अद्यापही होकार  दिलेला नाही.