घाटकोपर मतदारसंघातून प्रकाश मेहता यांच्या ऐवजी पराग शाह यांना उमेदवारी

0
358

मुंबई, दि.४ (पीसीबी) – भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जेष्ठ नेते एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे, घोटाळ्याचा आरोप असलेले प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. घाटकोपर मतदारसंघातून प्रकाश मेहता यांच्या ऐवजी नगरसेवक पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मेहता यांचा पत्ता कट करण्यात आल्याने चिडलेल्या कार्यकर्त्यांनी शाह यांच्या गाडीवर हल्ला केला आहे.

भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पराग शाह हे मेहतांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मेहतांच्या घरा बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली होती. शाह यांची गाडी पाहताच कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी घोषणाबाजी करत गाडीवर हल्ला करण्यात आला. वातावरण चिघळत असल्याने प्रकाश मेहता आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरु आहेत. सत्ताधारी भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांना पक्षाकडून यंदा उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एकनाथ खडसे यांच्यऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

माजी महसूलमंत्री असणारे एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील पक्षाकडून ‘होल्डवर’ ठेवण्यात आलं होत. पक्षातील प्रमुख नेते असताना देखील या तिघांची नावं पहिल्या यादीमध्ये न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र आता शेवटच्या यादीमध्ये नाव न आल्याने खडसे, तावडेंना अखेर भाजपकडून नारळ देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. २०१४ साली विनोद तावडे विजयी झालेल्या बोरीवली मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.