‘तिकीट का नाकारले याबद्दल चर्चा होईलच; पण माझे काम थांबणार नाही

0
343

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर नाराज असल्याची चर्चा असलेले पक्षाचे नेते व मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रथमच जाहीर प्रतिक्रिया दिली. ‘तिकीट का नाकारले याबद्दल चर्चा होईलच. पण माझे काम थांबणार नाही. मी संघाच्या विचारात वाढलोय. समाजाच्या हितासाठी पक्षाला अभिप्रेत काम करत राहणार,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचा मुंबईतील एक महत्त्वाचा चेहरा असलेले विनोद तावडे यांना भाजपने विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले आहे. तावडे यांचे नाव पहिल्याच यादीत अपेक्षित होते. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीतही त्यांना स्थान मिळाले नाही. शेवटच्या यादीत तरी नाव येईल या आशेवर ते होते. त्यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली होती. मात्र, आज जाहीर झालेल्या भाजपच्या चौथ्या यादीतही त्याचे नाव नव्हते. त्यांच्याऐवजी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे तावडे यांचा पत्ता कापण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

उमेदवारी नाकारल्यामुळे तावडे नाराज असल्याची चर्चा होती. तावडे यांनी ही सर्व चर्चा फेटाळली. ‘मी अभाविप आणि संघाच्या विचारात वाढलेला कार्यकर्ता आहे. मला आजपर्यंत बरेच काही मिळाले. विरोधी पक्ष नेता, आमदार, मंत्री झालो. अनेकांना काहीच मिळत नसूनही ते काम करतात. मीही त्याच भूमिकेतून यापुढे काम करेन. माझ्यासाठी साध्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे समाजहित डोळ्यापुढे ठेवून पक्षाला अभिप्रेत असे काम करणार,’ असे तावडे म्हणाले.