गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचे दुःख आणि चीड देखील – रोहित पवार

0
309

पुणे, दि. २५ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. गोपीचंद पडळकर यांची टीका ही खालच्या पातळीवरील राजकारण आहे. यामुळे दुःख होतं आणि चीड देखील येते. शरद पवार यांच्या कामाचा जितका अनुभव आहे, तितकं टीका करणाऱ्यांचं वयही नाही, असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी लगावला. यावेळी त्यांनी इतरही राजकीय स्थितीवर भाष्य केलं.माध्यमांना मुलाखत देतना ते बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर जे बोलले ते राजकीय वक्त्व्य होतं. त्यांना ज्यांनी आमदार बनवलं त्या भाजपच्या नेत्यानेच पडळकरांना हे चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यांच्याच नेत्याला हे वक्तव्य चुकीचं वाटलं. त्यांच्याच नेत्याने ते चुकले हे दाखवून दिलं. म्हणूनच आम्ही वेगळं बोलून काय करणार आहोत. शरद पवार मागील 50-55 वर्षांपासून लोकांसाठी काम करत आहेत. ते लोकांच्या मनात आहेत. त्यामुळे ज्या लोकांना काही काम नाही तेच शरद पवार यांच्या बदनामीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार यांचं जितकं वर्ष काम आहे इतकं याचं वयही नाही.”
“लोकांच्या मनात मोठं स्थान असलेल्या नेत्याविषयी असं काही बोललं की आपली राजकीय पोळी भाजेल असं काही लोकांना वाटतं. टीव्हीवर किंवा वर्तमान पत्रात येण्यासाठी त्यांचं हे खालच्या पातळीवरील राजकारण आहे. या राजकारणाचा लोकांना काहीही फायदा नाही. म्हणूनच आम्ही सर्वजण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. अशाप्रकारचं खालच्या पातळीवरील राजकारण पाहिलं की आम्हाला दुःख होतं, चिडही येते. आमच्या पिढीला हे असं राजकारण चालणार नाही. आम्हाला सकारात्मक राजकारण हवं जे लोकांच्या हिताचं आहे,” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

‘निषेध करताना नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या’
शरद पवार यांच्याविरोधातील पडळकरांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. यावर बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्र्वादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “पडळकरांबाबत कार्यकर्त्यांना इतकंच आवाहन आहे, की शरद पवार यांच्यावरील टीकेने तुम्ही दुखावला आहात. त्यामुळे तुम्ही एका व्यक्तिगत भावनेतून निषेध करत आहात. अशावेळी कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. अशा खालच्या पातळीवरील राजकारणाकडे दुर्लक्ष करा.”