वायसीएम चा हा भ्रष्टाचार खोदाई कोण करणार ?

0
341

थर्ड आय – अविनाश चिलेकर

पिंपरी चिंचवड महापालिकेला भ्रष्ट कारभाराचा शाप आहे. महापालिकेच्या जन्माला अगदी पाचवीलाच भ्रष्टाचार पुजला आहे. त्यामुळे सत्तेवर निगरगट्ट राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा सोवळे नेसलेला भाजपा, सर्व रितभात, प्रथा, परंपरा कायम आहे. तीस वर्षापूर्वी (१९८९) मध्ये तयार झालेल्या या हॉस्पिटलच्या बांधाकमाचा पायाच्या खोदाईपासून टक्केवारी झाली. तेव्हापासून अगदी आजपर्यंत जे जे साहित्य, मशिनरी, औषधे गोळ्या खरेदीत एक-दोन पट नव्हे तर आठ-दहा पटीने भ्रष्टाचार झाला. उस गोड लागला म्हणून मुळासकट (बाठ्यासह) खाल्ला. इथे वार्ड बॉय-आया पासून डॉक्टरांपर्यंतच्या भरतीत कोणी लोणी चाखले ते जनतेला माहित आहे. आजवरची कंत्राटे, करार मदार झाले त्यातही आंधळी कमाई काही नगरसेवकांनी केली. अगदी भंगारच्या लिलावातसुध्दा चाटूनपुसून खाल्ले. सुरक्षा रक्षकांचा आणि सफाईचा ठेका हेसुध्दा एक ज्वलंत उदाहरण आहे. आणखी कितीतरी दाखले देता येतील. डॉक्टर आणि परिसरातील मेडिकल स्टोअर्सचे संगनमत कित्तेकदा उघड झाले. ३० वर्षांत अपवाद वगळला तर कुठेही चौकशी झाली नाही, कोणावर कारावाई नाही. परिणामी मंडळी निगरगट्ट, निबर झालीत. ज्यांनी चौकशीची मागणी केली किंवा आदेश दिले त्यांनीही नंतर मांडवली केली. महापालिका आयुक्तपदी डॉ. श्रीकर परदेशी असताना फक्त एकाच प्रकरणात अद्दल घडेल असे शासन झाले होते. हायपरबोलीक ऑक्सिनज थेरपी (एचबीओटी) हे मशिन ७० लाखांचे पावणे तीन कोटींना खरेदी कऱणाऱ्या तत्कालिन रुग्णालय अधिक्षकांना अगदी निवृत्तीच्या दिवशी निलंबीत करण्याचे धाडस डॉ. परदेशी यांनी दाखविले होते.

एचबीओटी मशिनचे पैसे अडवून ठेवले होते, डॉ. परदेशी बदलून गेल्यानेतर ठेकेदाराला ते पैसे मिळाले. ज्यांना दोषी धरले होते तेसुध्दा सहिसलामत सुटले. ती मशिन पाच वर्षे वायसीएमच्या तळमजल्यावर धूळ खात पडून आहे. तीन कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेले. स्वाईन फ्लूची साथ आली होती त्यावेळी ३ व्हेंटीलेटर खरेदी केले. मुंबई महापालिकेने जे ३ लाखांत खरेदी केले ते आपण ९ लाखात घेतले. टीबी तपासणीसाठीचे मशिन खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला. विधानसभा अधिवेशनात तो विषय चर्चेला आला, किरकोळ कारवाई होऊन क्लार्क सुटला. सीटी स्कॅन मशिन खरेदीत ५० लाखाचा भ्रष्टाचार झाला, पण या कानाचे त्या कानाला खबर नाही. एक्सरे मशिन, सोनाग्राफि मशिन खरेदीतही कोट्यवधींचा गफला झाला. खरेदी केलेले सेकंड हॅन्ड निघाले. ऑपरेशन थिएटर मध्ये आवश्यक साहित्य खरेदीतही दुय्यम दर्जाचा माल अव्वल दर देऊन घेतला. तब्बल ३० वर्षे हे असेच सुरू आहे. करदाते डोळे झाकून कर भरतात आणि नगरसेवक- अधिकारी मिळून त्या पैशावर दरोडा टाकतात. त्यावेळचा किस्सा मजेशीर आहे. प्राधिकऱणातील भाजपा नगरसेविका डॉ. गीता आफळे होत्या. प्री मॅच्युअर बेबीसाठी न्यूओनेटर खरेदीचा विषय होता. जे मशिन ८० हजाराला मिळत होते, ते ८ लाखाला खरेदीचा प्रस्ताव होता. डॉ. गीता आफळे यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. २० वर्षापूर्वी शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते, तेव्हाचे आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी वायसीएमला भेट देऊन सखोल चौकशीचे आदेश दिले होते. डॉ.आहेर स्वर्गवासी झाले आणि चौकशीलासुध्दा स्वर्गवास मिळाला. आता आयुक्तांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे, ती काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. महापालिकेत लाचखोरीचे प्रकार अनेक आहेत. इथे तर थेट बँकेत पैसे जमा दिसतात. हा सुर्य हा जयद्रथ, असताना विलंब नसावा. अन्यथा या चौकशीलाही स्वर्गवास मिळेल.

भाजप नगरसेवकाचा आरोप –
धक्कादायक बाब म्हणजे यावेळी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनीच वैद्यकीय विभागाचा पंचनामा केला. गेल्या दोन-तीन वर्षांत केलेल्या प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला, तो किती पटीत आहे हे एकून आणखी शॉक बसेल. दर निश्चिती करताना एक रुपयांची वस्तू दहा रुपयांपर्यंत रिंग करून खरेदी केल्याचे त्यांनीच उघड केले. लॅब केमिकल, आयसीयु युनिट, ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन, सोनोग्राफी युनिट, एमआरआयसाठी सिरिंज पंप खरेदी, एक्स रे मशीन दुरुस्ती यासह अनेक प्रकारच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला. लॅप्रोस्कोप खरेदीत ५० लाखांची दीड कोटींना होत असल्याचे त्यांना उघड केले. दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला. यामध्ये पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून त्यांच्या स्वतःच्या खात्यावर रक्कम घेतल्याचे नगरसेवक कामठे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे त्याचे पुरवेही दिले आहेत. महापालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई केली पाहिजे, पण ते मुग गिळून बसलेत. जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड, अशी म्हण आहे. भ्रष्ट व्यक्तीला पाठिशी घालणे हे स्वतः हर्डीकर यांच्या स्वभावात आणि कृतीतही नाही. पण कचखाऊ भूमिका हीसुध्दा संशयाला जागा देते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो हे आयुक्तांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांचेच गुरू डॉ. श्रीकर परदेशी यांनी पुरावे मिळताच प्रचंड राजकीय दबाव असतानाही सेवानिवृत्तीच्या दिवशी थेट वायसीएम च्या रुग्णालय अधिक्षक डॉ. आनंद जगदाळे यांना निलंबित केले होते. त्यांचा आदर्श हर्डीकर घेतात की सर्व गुन्हे माफ करतात याकडे लोकांचे लक्ष आहे.

खरे तर, हे प्रकरण कारवाईसाठी थेट लाचलुचपत प्रतिबधक विभाग, प्राप्तिकर विभाग यांच्याकडे सोपविले पाहिजे. कामठे यांना खरोखर हा भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा असेल तर त्यांनी ती धमक दाखवावी. गेल्या ३० वर्षांतील खरेदी व्यवहार, त्यातील संबंधीत अधिकाऱ्यांचे बँक खाते, फार्मास्युटिकल कंपन्यांनी गिफ्ट दिलेले विदेश दौरे (सिंगापूर, थायलंड, बँकॉक, पटाया, युरोप), त्या सर्वांचे ज्ञात-अज्ञात उत्पन्नाचे स्त्रोत, जमा केलेली संपत्ती असा सखोल पंचनामा केला पाहिजे. शोधायचे म्हटले तर सगळे सापडेल, उगाच साप साप म्हणून भुई धोपटू नये. वासीएम म्हणजे अलिबाबाची गुहा आहे, ते ४० चोर कोण, कुठे आहेत ते आता शोधून काढा. लोकांच्या जिवाशी खेणाऱ्यांना बेड्या पडल्या पाहिजेत. कामठे यांनी शेवटपर्यंत लावून धरावे, पाठपुरावा करावा लोक साथ देतील. दूध का दूध होऊन जाऊ देत. नगरसेवक कोण आणि ठेकेदार कोण ते अस्पष्ठ आहे. बहुसंख्य नगरसेवकच मोठे दलाल, ठेकेदारी करतात. जीवावर उदार होऊन अत्यंत धाडसाने आता मोहिम उघडलीच आहेत, तर त्यांचाही पर्दाफाश करा. लढाईला निघाल्यावर आता तो माझा सोयरा, तो मित्र असे चालत नाही. कामठे हिरो होणार की झिरो ते आता काळ ठरवेल. त्यांनी तमाम नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.