पैठण येथील सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक

0
311

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – औरंगाबाद पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. तो विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यात फरार होता. तसेच त्याच्यावर अन्य सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अशोक नाना महापुरे (वय 26, रा. गोळेवाडी, आंबी ता. मावळ, जि. पुणे. मुळ रा मु.पो.पैठण, लक्ष्मीनगर औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाहीजे आणि फरारी आरोपी पकडण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष मोहीम सुरू आहे. दरम्यान बुधवारी तळेगाव परिसरात गस्त घालत असताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे व दत्तात्रय बनसुडे यांना माहिती मिळाली की, पैठण येथील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी तळेगाव जवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी अशोक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता पैठण येथे एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल असल्याचे सांगितले.

आरोपी अशोक हा वाहन चालक म्हणून काम करतो. तो औरंगाबाद पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर एमआयडीसी पैठण, पैठण, बिडकीन पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी पैठण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, सावन राठोड, फारुक मुल्ला, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, नितीन बहिरट, राजकुमार इघारे, श्यामसुंदर गुट्टे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र कदम यांच्या पथकाने केली आहे.