गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये व्हाईटनर लावून खाडाखोड केल्याने पोलीस कर्मचा-याचे निलंबन

0
621

चाकण, दि. १० (पीसीबी) – गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये व्हाईटनर लावून कलम खोडून आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत चाकण पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (दि. 9) रात्री उशिरा आदेश दिले.

पोलीस नाईक अशोक रामचंद्र जायभाये (नेमणूक – चाकण पोलीस स्टेशन) असे निलंबन झालेल्या पोलिसाचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्यात जुलै 2020 मध्ये एक गुन्हा दाखल आहे. त्यात 326 हे कलम लावणे अभिप्रेत होते. मात्र ते कलम या प्रकरणात जाणीवपूर्वक लावण्यात आले नाही. त्यानंतर या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करताना दोषारोपपत्र आणि इतर कागदपत्रांवर व्हाईटनरचा वापर करण्यात आला.

गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये खाडाखोड करून व्हाईटनरने सरकारी दस्तऐवजात बदल केले. संबंधित गुन्ह्यात आरोपीला सगळ्या प्रकारापासून वाचण्यास मदत करण्याच्या हेतून हे कृत्य केल्याचे दिसून येत असल्याने पोलीस नाईक अशोक जायभाये याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.