‘या’ भारतीय खेळाडूंनी मिळवली ऑलिंपिक पात्रता

0
188

नवी दिल्ली, दि.१० (पीसीबी) : भारताच्या अंन्शु मलिक सोनम मलिक या दोघींनी आज ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली. या दोघींनी अनुक्रमे ५७ आणि ६२ किलो वजनी गटातून आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठून ही कामगिरी केली. अंतिम फेरीच्या लढती संध्याकाळी होणार आहेत.

कझाकस्तानात अल्मटी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १९ वर्षीय अंन्शुने एकतर्फी वर्चस्व राकताना उझबेकिस्तानच्या अखमेडोवा हिचा उपांत्य फेरीत पराभव केला. त्याच वेळी १८ वर्षीय सोनम हिने कझाकस्तानच्या अयाउलीम कासीमोवा हिचे तगडे आव्हान पहिल्या १६ सेकंदातील ०-६ अशा पिछाडीनंतर ९-६ असे मोडून काढले. सावध आणि संयम हे तिच्या खेळाचे वैशिष्ट्य होते.

भारताच्या निशी दहिया हिला देखिल ऑलिंपिक पात्रेची संधी होती. मात्र, ६८ किलो वजनी गटात तिला उपांत्य फेरीत किर्गीझस्तानच्या झुकामायोवा हिच्या कडून एकतर्फी लढतीत पराभव पत्करावा लागला.

भारताने आता टोकियोसाठी सहा ऑलिंपिक पात्रता मिळविल्या असून, तीन महिला आणि तीन पुरुषांमध्ये आहेत. महिला विभागात यापूर्वी विनेश फोगट हिने जागतिक स्पर्धेतून पात्रता सिद्ध केली आहे. पुरुष विभागात बजरंग पुनिया, रवी कुमार दहिया आणि दिपक पुनिया यांनी ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली आहे. आता उद्या फ्री-स्टाईल विभागात भारताचे आणखी तीन मल्ल ऑलिंपिक पात्रतेसाठी खेळतील. ग्रीको रोमन विभागात भारताला ऑलिंपिक पात्रता मिळविण्यात यावेळी अपयश आले. आता त्यांना जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीची वाट पहावी लागेल.