गजा मारणे सारख्या तमाम गुंडांचे पोशिंदे तुम्हीच ना…थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
1186

गुंड गजा मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्या प्रकरणाची सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. सर्वप्रथम पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुंड गजा मारणेसह त्याच्या सर्व समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी मारणेसह नऊ जणांना अटक केली. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता त्यांनी प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र राज्यात अशाप्रकारे गुंडाने मिरवणूक काढून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्याचं बोललं जातं. पिंपरी चिंचवड त्यात अग्रभागी आहे. यापूर्वी येरवडा जेलमधून सुटून आलेल्या गुंडाची मिरवणूक काढली, फटाक्यांची आतशबाजी केल्याचे दोन-तीन प्रकारही झालेत. आता तर महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात. राजकारण, निवडणुका म्हणजे गुंडांसाठी अगदी पर्वणी. भाई, भाऊ, दादा, मामा यांचा उत्सव. समाजातील नामचीन, टपोरी गुंडांना उमेदवारी देऊन पावन करून घेण्याची चढाओढ असते. काँग्रेसने त्याचा पायंडा पाडला. राष्ट्रवादीने त्यावर कळस केला. शिवसेनेचा पिंड या मंडळींवर पोसला गेला. सगळेच नागवे झाल्याने भाजपानेसुध्दा सोवळे सोडून दिले आणि खून, खंडणी, दहशत निर्माण करणाऱ्या तडिपारांना अगदी सन्मानाने पक्षात घेतले. इतरांपेक्षा वेगळे असल्याचे नाटक वठवले, वाल्ह्याचा वाल्मिकी केला तर बिघडले कुठे असे लंगडे समर्थन केले आणि अनेक गुंडांना भाजपानेही आपलेसे केले. वडिल ते खोडिल मग धाकटे का सोडील अशी म्हण आहे. त्यानुसार मनसे सारख्या पिटुकल्या पक्षानेही त्यांची री ओढली. गुंड गजा मारणेच्या पत्नीला मनसेची उमेदवारी होती म्हणतात. असे अनेक दाखले देता येतील. प्रश्न असा आहे की, असे गजा मारणे पैदा होतातच कसे. त्यांना दानापाणी कोण घातलो, प्रतिष्ठा कोण मिळवून देतो. मुळावर घाव घातला तर खोड उन्मळून पडेल, पण ती इच्छाशक्ती एकाही राजकीय नेत्याकडे नाही. गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. गृहखातेही त्यांच्याकडे होते. त्यांनीत्या काळात गुंडांना उमेदवारी दिली, पण किमान ५० गुंडांचा चकमकीत खात्मा केला. आताचे गृहमंत्री अनिल देखमुख यांना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना ते शक्य नाही. कारण सगळेच लागेबांधे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गजा मारणे प्रकरणावर प्रतिक्रिया देतेना , “त्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आहे. त्याची माहिती आल्यानंतर कारवाई केली जाईल. कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीनं अडचणी निर्माण करणारं कोणीही असो मग ती राजकीय क्षेत्रातील असेल, गुंडगिरी करणारी, किंवा टोप्या घालणारी असेल…कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांसाठी नियम लावले गेले पाहिजे. सर्वांनी चौकटीत राहूनच आपलं काम केलं पाहिजे” असेही ते म्हणाले. दादा, तुम्हाला खरोखर मुळावर घाव घालायचाच असेल तर एकाही गुंडाला आम्ही उमेदवार देणार नाही, असे प्रथम जाहीर करा. लोक आता राष्ट्रवादीकडे आशेने पाहत आहेत. टपोरी अथवा गावावरून ओवाळून टाकलल्यांना कायमचे दरवाजे बंद, त्यांची जागा कोठडीत आहे. संस्कारक्षम पिढीला समाजकारण, राजकारणात मान्यता द्या. असे झाले तरच ही पैदास बंद होईल.

गजा मारणे हा तरुणांचा आय़डॉल होतोच कसा ?
दोन खुनांच्या प्रकरणात गजा मारणे हा तळोजा कारागृहात होता. न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्याने त्याच्या समर्थकांनी कारागृह ते पुण्यापर्यंत ३०० चारचाकी वाहनांचा ताफा सोबत घेऊन त्याचे जंगी स्वागत केले. तरुणांचे जथे ठिल्लरबाजी करत नाक्यावर त्याला पाठिंबा देतात, फटाके वाजवतात, ड्रोन शुट करून ते सोशल मीडियावर टाकून दहशत पसरवतात. इतके सगळे भयंकर घडते, पण कोणी राजकारणी चकार शब्द काढत नाही. दहशत पसरविणाऱ्यांना एक प्रकारे सरकारचीच मुक संमती आहे की काय असा संशय येतो. आता भाजपाची मंडळी महाआघाडी सरकरावर तुटून पडत आहेत. पुणे शहरापूरते बोलायचे तर आंदेकर, माळवदकर टोळी, बोडके टोळीचा इतिहास आठवतो. भाजपा नगरसेवक सतिश मिसाळ यांचा खून माहित आहे. अन्या डॉन कोणाचा होता. वत्सला आंदोकर यांना महापौर कोणी केले. कसब्यातील टपोरी कोणाचे होते. कोथरूड, येरवडा, कात्रज, हडपसर, खडकी, सिंहगडरोड अशा पुणे शहराला गुंडांनी वेढा घातला आहे. कोणालाही सत्तेजवळ पोहचायचे तर त्यांची मदत घ्यावी लागते. निवडणुकिच्या लोकशाहित आपले किती पतन झाले त्याचा हा मापदंड आहे. पूर्वी गुंडांना नेते पोसत आता गुंडांनी नेते पोसायला सुरवात केली आहे. प्रविण तरडे यांचा `मुळशी पॅटर्न` त्याचे प्रतिक आहे. आजची तरुण पिढी गजा मारणे च्या मागे जातेच कशी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. बेरोजगारी हे एक कारण आहे. चंगळवादातून आपला समाज किती नासला आहे, त्याचे हे लक्षण आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकिला किती गुंडांना कोणत्या राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली होती याचा फक्त एक लेखाजोख मांडला तरी गजा मारणे ची पैदास कशी होते याचा उलगडा होईल. हे थांबवता येणे सहज शक्य आहे. आपल्या कारभाऱ्यांनी मनावर घेतले पाहिजे. समाजात सज्जन शक्तीची कमी नाही.

पिंपरी चिंचवडला गजा मारणेचे भाऊबंद –
पुणे विद्याचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी बरोबर आता गुंडांचे शहर झाले. पिंपरी चिंचवडची ओळख उद्योगनगरी, श्रमिकांचे शहर अशी होती, आता इथेसुध्दा गल्लीबोळात खून, खंडणीबहाद्दर नाक्या नाक्यावर सापडतील. काठ्या-लाठ्या, कोयते-तलवारी, गावठी कट्टे बाळगानाऱ्या टोळ्या प्रत्येक झोपडपट्टीत आहेत. तीन महिन्यापूर्वी नेगरूनगरला १००-१२५ तरुणांच्या टोळक्याने नंग्या तलवारी घेऊन दहशत केली होती. २५-३० सापडले बाकीचे पोलिसांनीच मांडवली केल्याने सुटले. दोन दिवसांपूर्वी आकुर्डी गावठाणात टोळी युध्दाचा भडका उडाला. कासारवाडीत एका माजी नगरसेविकेच्या घरात कोयते घेतलेली गँग घुसली आणि मोठी तोडफोड करत दहशत केली. भोसरी, मोहननगर, वाल्हेकरवाडी, पिंपरीगाव, काळेवाडी, निगडी ओटा, रुपीनगर, किवळे, देहूरोड हे आज गुंडांच्या ताब्यात आहे. १०० अटक केले की २०० नवे निपजतात. कारण `माझ्या मुलाला भाई बनायचे`, असे छातीठोकपणे सांगणारे हरामी बाप इथे आहेत. २८७ बाल गुन्हेगारांना वळणावर आणायचे म्हणून पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाष आणि त्यांची टीम दिवसरात्र मेहनत घेते. दुसरीकडे दुप्पट वेगाने नवे बाल गुन्हेगार समाजात तयार होतात. आज शहरात किमान हजारावर गुंडांची पैदास झाली आहे. त्यांना राकीय मंडळींचा आशिर्वाद आहे. गेल्या पाच-सहा पंचवार्षीक निवडणुकांचा आढावा घेतला तर प्रत्येक वेळी किमान ४०-५० गुंड उजळमाथ्याने निवडणूक आखाड्यात असतात. गेल्यावेळी ४० नगरसेवक गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते, असे पोलिसांचे रेकॉर्ड सांगते. यावेळी त्यात पाच-सहाची भर पडली. लोकशाहिची ही थट्टा आहे. पुणे शहराच्या पावलावर पाऊल ठेवत पिंपरी चिंचवड चालते. इथे नगरसेवक राजेंद्र काळे आणि अनिल हेगडेचा भर दिवसा खून कसा झाला ते लोक विसरत नाहीत. टोळीयुध्दातून किती खून झाले त्याची जंत्री मोठी आहे. टोळ्यांची यादीसुध्दा वाढतेच आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आल्यापासून त्यांनी तमाम गुंडांच्या मुस्क्या आवळल्याने तूर्तास लोक भयमुक्त पिंपरी चिंचवडचा अनुभव घेत आहेत. आता आगामी काळात एकही गुंड नगरसेवक होणार नाही याची दक्षता राजकीय पक्षांनी घेतली आणि लोकांनीही त्यांना मतदान केले नाही तर शहर १०१ टक्का गुन्हेगारी मुक्त होईल. गजा मारणे ची पैदास बंद होईल.