वारकरी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब हांडे

0
259

पिंपरी, दि. 20 (पीसीबी): वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. भाऊसाहेब हांडेमहाराज यांची शुक्रवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती करण्यात आली. आकुर्डी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २७अ येथील संत तुकाराम उद्यान सभागृहात वारकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठलमहाराज पाटील यांनी ह.भ.प. भाऊसाहेब हांडे यांना निवडीचे पत्र सुपुर्द केले. त्याचप्रमाणे कार्याध्यक्षपदी ह.भ.प. बांगरमहाराज, उपाध्यक्षपदी ह.भ.प. पूर्णानंदमहाराज लोखंडे आणि परिषदेच्या राज्य युवाध्यक्षपदी अनंत गटकळ यांची नियुक्ती करण्यात आली. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राज्यात सुमारे साडेतीनशे (३५०) शाखा असून आकुर्डी प्राधिकरणातील मेळाव्यात काही शाखांचे मोजके प्रतिनिधी आणि युवा कार्यकर्ते गगनगिरी पाटील यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी ह.भ.प. विठ्ठलमहाराज पाटील आपल्या अध्यक्षीय मनोगतातून म्हणाले की, “महाराष्ट्रातील सर्व जातीपातींमधून आलेल्या संतांनी आपल्या साहित्यातून प्रबोधन करीत असताना समाजाला मानवतेची शिकवण दिली. संतसाहित्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य वारकरी, धारकरी यांनी केले. जागतिक कीर्तीचे थोर विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वर्तमानपत्रांतून ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि गाथेमधील अभंग छापले होते. पुणे आणि पुणे जिल्ह्यातील परिसर ही ज्ञानोबा – तुकोबांप्रमाणेच जिजाऊ माँसाहेब अन् छत्रपती शिवाजीमहाराज यांची कर्मभूमी आहे. तसेच ज्ञानाचे माहेरघर अशीही पुण्याची सर्व जगामध्ये ख्याती आहे. अशा या भूमीत आताच्या काळात संतविचार रुजविण्याचे कार्य वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य ही संस्था विविध संमेलने आणि मेळाव्यांच्या माध्यमातून करते. युवा पिढीचे जीवन सुसंस्कृत, निष्कलंक, निर्व्यसनी आणि सात्त्विक होण्यासाठी घरोघरी संतसाहित्य अन् संतविचार पोहोचले पाहिजेत म्हणूनच वारकरी साहित्य परिषद ही संस्था राज्यभर कार्यरत आहे!”
पुणे जिल्हा शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब हांडे यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त करीत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची ग्वाही दिली.
ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. ह.भ.प. रामदास महाराज कुटे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.