खासदार नवनीत राणा, रवी राणा यांच्या प्रतिमेला घातला गेला चपलांचा हार; धक्कादायक कारण आलं समोर…

0
551

अमरावती, दि. ३० (पीसीबी) : मेळघाटातील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील दोषींचा निषेध व्यक्त करताना राणा दाम्पत्याने होळी सणाचा अवमान केला, असा आरोप शिवसेनेने केला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या फोटोला शिवसेना कार्यकर्त्यांनी चपलांचा हार घातला.

मेळघाटमधील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात हरिसालमधील आरोपी विनोद शिवकुमार आणि मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निषेधार्थ होळी करण्यात आली होती. मात्र या होळीत राणा दाम्पत्याने चपलांचा वापर केला होता. त्यामुळे हिंदू धर्मीयांची भावना दुखावला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
होळीसारख्या हिंदू धर्मीयांच्या पवित्र सणाचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हरीसाल येथे अपमान केल्याचा आरोप शिवसेनेने केला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेने राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक आंदोलन केले. त्यानंतर दोघांच्या फोटोला चपलांचा हार घालत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींच्या प्रतिमेचे राणा दाम्पत्याने रविवारी संध्याकाळी दहन केले. खासदार, आमदार, गावकरी आणि वनरक्षक यांच्या उपस्थितीत दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणारे डीएफओ शिवकुमार आणि सीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्या पुतळ्याचे होळीमध्ये दहन करुन राणा दाम्पत्याने घटनेचा निषेध व्यक्त केला.

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केलेल्या हरीसाल येथील शासकीय निवासस्थानाला नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करत ही दुर्दैवी घटना कशी घडली याची माहिती शेकडो आदिवासी बांधव आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत घेतली.

एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागणे, अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचे नवनीत रवी राणा म्हणाल्या. यासाठी जबाबदार असणाऱ्या शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कलम 302 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आपण राज्यपाल, केंद्रीय वनमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे वचनही त्यांनी गावकऱ्यांना दिले.