खबळजनक…यमुना नदीत वाहत आला मृतदेहांचा पूर…!

0
2851

लखनऊ,दि.८(पीसीबी) – उत्तर प्रदेशात करोनाने भयावह स्थिती निर्माण झाली आहे. आता गावांमध्ये करोनाने थैमान घातले आहे. यूपीच्या हमीरपूर जिल्ह्यातील अशीच हृदय पिळवटून टाकणारे फोटो समोर आले आहेत. हे फोटो आहेत यमुना नदीत वाहत असलेल्या अनेक मृतदेहांचे. गावकरी अंत्यसंस्कार करण्याऐवजी मृतदेह थेट यमुना नदीत प्रवाहित करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

यमुना नदीत शुक्रवारी अचानक अनेक मृतदेह दिसून आले. या घटनेने परिसर हादरला. गया येथील पोलिसांसह स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली. यमुने वाहत असलेल्या मृतदेहांचा तपास करण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कानपूर आणि हमीरपूर जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे मृत्यू होत आहेत. गावकरी सर्व मृतदेह यमुनेत सोडत प्रवाहित करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार यमुनेत अनेक मृतदेह वाहत असल्याचं आढळून आलं.

गावातील मुलांसमोर अनेक मृतदेह यमुनेत प्रवाहित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून अनेक मृतदेह आणले जातात आणि यमुना नदीत सोडले जात आहेत, असं मुलांनी सांगितलं. हमीरपूर जिल्ह्यातून वाहत असलेल्या यमुनेचा उत्तरेतील किनारा कानपूर जिल्ह्याला लागून आहे. हमीरपूर जिल्ह्यातील नागरिक यमुना नदीला मोक्षदायिनी कालिंदीचे रुप मानतात. यामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह अशाच प्रकारे नदीत प्रवाहित करण्याची जुनी परंपरा आहे. सामान्यपणे यमुनेत असेही एक दोन मृतदेह आढळून येतात. पण आता तर मृतदेहांचा पूरच आला. यामुळे यूपीच्या ग्रामीण भागात किती मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.