कोहलीच योग्य कर्णधार; शोएब अख्तरची रोहितला नापसंती

0
420

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – टीम इंडियाचा ३ ऑगस्टपासून विंडीज दौरा सुरु होणार आहे. टी २० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची रविवारी निवड करण्यात आली. निर्धारित षटकांसाठी वेगळा आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार अशी पद्धत भारतीय संघात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण तीनही प्रकारांमध्ये विराट कोहली याच्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धूरा सोपावण्यात आली. याबाबत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी गावसकर यांचे मत पटले नसल्याचे म्हटले. तशातच आता माजी पाक क्रिकेटपटू शोएब अख्तर याने कोहलीच योग्य कर्णधार असल्याचे म्हटले आहे.

शोएब अख्तरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. त्याने चाहत्यांना १५ मिनिटांचा अवधी दिला होता. त्यात चाहत्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची मुभा होती. त्यावेळी एका चाहत्याने त्याला रोहित शर्माकडे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद द्यावे का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याची ‘गरज नाही’, असे रोखठोक उत्तर शोएबने दिले.

दरम्यान, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्याच्या निर्णयावर टीका केली. निवड समितीने विराट कोहलीची कर्णधारपदी नियुक्ती करण्याआधी कोणतीही चर्चा केली होती का? असा सवाल गावसकरांनी विचारला. एका वृत्तपत्रात लिहलेल्या स्तंभात त्यांनी आपले विचार मांडले. “आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडायच्या आधी, निवड समितीने कर्णधारपदासाठी बैठक बोलावणे गरजेचे होते. माझ्या माहितीनुसार, विश्वचषकापर्यंतच विराट कोहलीकडे कर्णधारपद होते. विश्वचषकात विराटकडून ज्या अपेक्षा केल्या जात होत्या, त्याप्रमाणे त्याची कामगिरी झालेली नाही. संघातील काही खेळाडूंना खराब कामगिरीचे कारण देत जागा नाकारण्यात आली, मग विराटने त्याच्याकडून होत असलेल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे का?” गावसकरांनी आपले परखड मत मांडले.