कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत ‘दिवाळी कशी साजरी करावी?’

0
221

“या वर्षी १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी उठवली जात असून जनजीवन पूर्ववत् होत असले, तरी काही ठिकाणी सार्वजनिक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करण्यास मर्यादा आहे. अशा ठिकाणी दिवाळी साजरी कशी करावी, याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.”

प्रश्‍न : वसुबारस या दिवशी बाहेर पडून सवत्स गायीची पूजा करावी का ? पूजा करणे शक्य नसल्यास काय करावे?
उत्तर : वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येत असल्याने त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. वसुबारस या दिवशी बाहेर पडून सवत्स गायीची पूजा करण्यास अडचण असेल, तेव्हा घरी एखादी गायीची मूर्ती असल्यास तिची पूजा करावी. घरी मूर्ती नसल्यास गायीचे पाटावर चित्र काढून त्याची पूजा करावी.

प्रश्‍न : नरकचतुर्दशीला आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहुर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीची फांदी डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत ३ वेळा गोलाकार फिरवतात. यासाठी मूळ असलेली आघाडा वनस्पती वापरतात. यासाठी आघाडा वनस्पती उपलब्ध न झाल्यास काय करावे ?
उत्तर : आघाडा वनस्पती उपलब्ध न झाल्यास देवाला प्रार्थना करून स्नान करावे.

प्रश्‍न : दिवाळीच्या दिवसांमध्ये यमतर्पण, ब्राह्मणभोजन, वस्त्रदान केले जाते. हे करणे शक्य नसल्यास काय करावे ?
उत्तर : यमतर्पण हा विधी घरी करणे शक्य आहे. यामध्ये यमाची १४ नावे घेऊन पाण्यानेे तर्पण केले जाते. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. ब्राह्मणभोजन घालणे आणि वस्त्रदान करणे शक्य नसल्यास अर्पणाचा सदुपयोग होईल, अशा ठिकाणी किंवा धार्मिक कार्य करणार्‍या संस्थांना काही रक्कम अर्पण करावी.

प्रश्‍न : लक्ष्मीपूजनासाठी धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे आदी साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही, तर काय करावे ?
उत्तर : लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले नाही, तर जेवढे उपलब्ध आहे, त्या साहित्यात भावपूर्णरित्या पूजाविधी करावा. बत्तासे आदी साहित्य न मिळाल्यास, देवाला घरातील तूपसाखर, गूळसाखर किंवा एखादा गोड पदार्थ यांचा नेवैद्य दाखवावा.

प्रश्‍न : अभ्यंगस्नासाठी उटणे उपलब्ध न झाल्यास काय करावे ?
उत्तर : अभ्यंगस्नासाठी उटणे उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी खोबरेल तेलात हळद घालून ते अंगाला लावावे.

प्रश्‍न : तुळशीविवाहासाठी पुरोहित उपलब्ध झाले नाहीत, तर काय करावे ?
उत्तर : तुळशीविवाहासाठी पुरोहित उपलब्ध झाले नाहीत, तर आपल्याला जशी जमेल, तशी भावपूर्ण पूजा करावी. तेही जमत नसेल, तर ‘श्री तुलसीदेव्यै नमः’ असा नामजप करत तुळशीची पूजा करावी. पूजा झाल्यावर रामरक्षेतील पुढील ओळी म्हणाव्यात.

‘रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ॥
रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥’

त्यानंतर बृहद्स्तोत्ररत्नाकर या ग्रंथामधील सरस्वतीस्तोत्राच्या आरंभीच्या पुढील ओळी म्हणाव्यात.

‘या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्‍वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥’

हे श्‍लोक म्हटल्यावर ‘सुमुहुर्त सावधान’ असे म्हणून तुळशीवर अक्षता वहाव्यात.

दिवाळीचे आध्यात्मिक महत्त्व, सण साजरा करण्याची पद्धत यांविषयी विस्तृत माहिती सनातनच्या ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ या ग्रंथांमध्ये दिली आहे. www.sanatanshop.com या संकेतस्थळावर हा ग्रंथ ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय www.sanatan.org या संकेतस्थळावरही दिवाळीविषयीची विस्तृत माहिती उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ही संकेतस्थळे आवर्जून पहावीत.

दृष्टीकोन –
दिवाळी या सणाच्या दिवसांत मौजमजा करण्याची परंपरा पडली आहे. सध्याची आपत्कालीन स्थिती पहाता मौजमजेमध्ये वेळ वाया घालवणे योग्य नाही. कोरोनाचे संकट हळूहळू न्यून होत असले, तरी आपत्काळामध्ये कोणत्या क्षणी कोणते संकट येईल, याचा नेम नाही. जागतिक स्तरावर काही देशांमध्ये युद्धे चालू आहेत. अनेक देशांमध्ये परस्पर संघर्ष चालू आहेत. अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. या घडामोडी जगाला तिसर्‍या महायुद्धाकडे घेऊन जाणार्‍या आहेत. येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनेचे बळ असणे आवश्यक आहे. सध्याचा काळ हा साधनेसाठी संधीकाळ असल्याने या काळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये मौजमजेमध्ये वेळ वाया न घालवता अधिकाधिक वेळ साधनेला देण्यासाठी प्रयत्न केल्यास व्यक्तीला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल.’

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था