कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तयारी सुरु

0
289

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची तयारी केंद्र सरकारकडून सुरु झाली आहे.

देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारनं पुढच्या दोन-तीन महिन्यांत देशातील विविध भागात 50 इनोव्हेटिव्ह मॉड्युलर रुग्णालये उभारण्याची तयारी केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, मूलभूत, पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी हे मॉड्यूलर रुग्णालये बांधली जातील. सध्याच्या रुग्णालयातील विद्यमान पायाभूत सुविधांचा भार कमी व्हावा, या उद्देशानं या मॉड्यूलर रुग्णालयांची बांधणी होईल.

दरम्यान, आयसीयू 100 बेडसह अशी 50 मॉड्युलर रुग्णालये तयार केली जातील. तीन आठवड्यात उभारणी होणाऱ्या या रुग्णालयांना बनवण्यासाठी 3 कोटी रुपये एवढा अंदाजित खर्च येईल. तर 6-7 आठवड्यात ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होतील.