किरीट सोमय्या यांनी १५ कोटी अधिकाऱ्यांना दिले ….

0
199

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या हे बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना ईडीची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यापैकी काही हिस्सा ईडीच्या अधिकाऱ्यांना नेऊन देतात, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेऊन किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांची पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपीसोबत भागीदारी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांच्यावर नवे खळबळजनक आरोप केले.

किरीट सोमय्या आणि त्यांचा मित्र अमित देसाई यांनी मुंबईतील एका बिल्डरला धमकी देऊन त्याचा प्लॉट लाटला. ८ जेव्हीपीडी स्कीम रोड, सुजीत नवाज प्लॉट या जागेची बाजारभावानुसार किंमत ११० कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ईडीची धमकी देऊन किरीट सोमय्या यांनी हा प्लॉट संबंधित बिल्डरला मातीमोल भावात अमित देसाई यांच्या नावावर करायला लावला. त्यानंतर किरीट सोमय्या याने ईडीच्या एका अधिकाऱ्याला १५ कोटी रुपये नेऊन दिले. ईडीच्या या अधिकाऱ्याने यावर स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा मीच त्या अधिकाऱ्याचे नाव उघड करेन, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. संजय राऊत यांच्या या नव्या आरोपांमुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत किरीट सोमय्या महाविकासआघाडीच्या नेत्यांचे कथित घोटाळे उघड करत होते. परंतु, संजय राऊत यांनी त्यांच्यावर लागोपाठ आरोप करुन किरीट सोमय्या यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

किरीट सोमय्या यांना भाजपच्या नेत्यांचा पाठिंबा नाही, असे राऊत यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या तपास अधिकारी नाहीत. भाजपने सोमय्या हा त्यांचा जबाबदार माणूस आहे, हे सांगावे. सोमय्या करत असलेले आरोप भाजपला मान्य आहेत का, हे स्पष्ट करण्यात यावे. मी शिवसेनेचा जबाबदार माणूस म्हणून बोलत आहे, असे राऊत यांनी म्हटले. त्यामुळे किरीट सोमय्या हे एकाकी पडले आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे. या सगळ्याची सुरुवात तुम्ही केलेय, आम्ही नव्हे. पण या सगळ्याचा शेवट आम्हीच करू, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. शिवसेना नेते अर्जून खोतकर, आनंदराव अडसूळ, भावना गवळी यांना ईडीकडून त्रास देण्यात आला, असेही राऊत यांनी सांगितले. तसेच अमोल काळे हा कोण आहे, याचा खुलासा भाजपने करावा. अन्यथा आम्ही त्याला समोर आणू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.