आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये सुरु केले एम्पॉवर – एक सर्वांगीण मानसिक आरोग्य देखभाल केंद्र

0
327

सेंटरचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र राज्याचे माननीय सार्वजनिक बांधकाम, मृदा व जलसंधारण, वन, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री व सोलापूरचे माननीय पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत पार पडले.

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) :पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या मदतीने एम्पॉवरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये सुरक्षित व सहायक वातावरणात, अतिशय अनुभवी मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञांमार्फत समुपदेशन (कौन्सेलिंग), थेरपी आणि उपचार यांच्यासह सर्वसमावेशक मानसिक आरोग्य सेवा पुरवण्यात येतील. एम्पॉवर या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या साहाय्याने चालवण्यात येणाऱ्या क्रांतिकारी सामाजिक उपक्रमांतर्गत एम्पॉवर सेंटर पुण्यामध्ये आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आज सुरु करण्यात आले.

पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ए विंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एम्पॉवर सेंटरचे उद्घाटन एम्पॉवरच्या संस्थापिका व अध्यक्षा श्रीमती नीरजा बिर्ला यांनी प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र राज्याचे माननीय सार्वजनिक बांधकाम, मृदा व जलसंधारण, वन, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री व सोलापूरचे माननीय पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ श्रीमती रेखा दुबे यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत केले. गेल्या दोन वर्षात पुण्यासह एकूण महाराष्ट्रात मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. बीएमसी:एम्पॉवर १:१ हेल्पलाईनकडून हाती आलेल्या माहितीनुसार एम्पॉवरच्या असे निदर्शनास आले आहे की आरोग्यविषयीची चिंता, दुःख, व्यसने आणि ताणतणाव यांच्याशी संबंधित तब्बल ५०,००० पेक्षा जास्त कॉल्स महाराष्ट्रातून आले. मानसिक आरोग्य समस्यांचे निवारण करण्यासाठी तज्ञांची मदत घेण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचे यावरून दिसून येते. खास करून, पुण्यामध्ये, आयटी आणि स्टार्ट-अप हब म्हणूनही ओळखले जाणाऱ्या या शहरामध्ये काम व खाजगी जीवनातील असंतुलन, एकाच वेळी अनेक कामे करावे लागण्याचे ओझे आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा तणाव यामुळे मानसिक चिंता सहन कराव्या लागणारे लोक अनेक आहेत, ज्यामुळे सर्वांगीण मानसिक आरोग्य सेवा केंद्राची गरज वाढत आहे. समाजात निर्माण होत असलेली ही गरज पूर्ण करण्याचे काम पुण्यातील एम्पॉवर सेंटर करेल. एम्पॉवर सेंटर सुरु झाल्यामुळे पुणे व आजूबाजूच्या भागांतील रहिवाशांना दर्जेदार मानसिक आरोग्य देखभाल सेवा पुरवल्या जाऊ शकतील.

दीर्घकाळापासून सुरु असलेल्या महामारीमुळे मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व जाणवून दिले असून, सर्वांगीण आरोग्य देखभाल व्यवस्थापनासह मानसिक आरोग्य सेवा देखील गरजेच्या असल्याच्या मुद्द्याकडे सध्याच्या सरकारचे लक्ष वेधले आहे. पुण्यामध्ये सुरु करण्यात आलेल्या एम्पॉवर सेंटरमध्ये मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ञ, स्पीच थेरपीस्ट्स, ऑक्युपेशनल थेरपीस्ट्स, लहान मुले व वयस्क व्यक्तींचे मानसोपचारतज्ञ इत्यादींची संपूर्ण टीम उपलब्ध असून सुरक्षित व सहायक वातावरणात, समुपदेशन, थेरपी व उपचार पुरवले जातील. हे एम्पॉवर सेंटर ५००० चौरस फुटांचे असून याठिकाणी ८ कन्सल्टिंग रूम्स आणि १३ थेरपी रूम्स आहेत. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आराम वाटावा असे आश्वासक वातावरण राखले गेले आहे, तसेच रुग्णांची संपूर्ण माहिती पूर्णपणे गोपनीय राखण्याची नीट काळजी देखील याठिकाणी घेतली जाईल.

पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एम्पॉवर – सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापिका व अध्यक्षा श्रीमती नीरजा बिर्ला यांनी सांगितले, “सर्वात आधी मी माननीय श्री. अजित पवार जी यांचे आभार मानते की त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून आमच्या पुणे सेंटरच्या उद्घाटनासाठी वेळ दिला आणि मानसिक आरोग्यासारख्या भारतातील आरोग्यसेवाक्षेत्राशी संबंधित, एका अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षिल्या जाणाऱ्या मुद्द्यामध्ये ते स्वतः लक्ष घालत आहेत. आज भारतात १४% हुन जास्त व्यक्ती काही ना काही मानसिक आरोग्य समस्यांनी त्रस्त आहेत, यांची एकूण आकडेवारी जवळपास २० कोटी इतकी जास्त आहे. महामारीमुळे या समस्येने अधिक जास्त गंभीर रूप धारण केले आहे, लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यातच मानसिक आरोग्य समस्यांनी त्रस्त व्यक्तींची संख्या २०% नी वाढली. मानसिक आरोग्याची समस्या असलेल्यांपैकी ८०% लोकांना वर्षभर काहीच उपचार मिळत नाहीत, रुग्ण आणि उपचारांमधील अंतर ८३% इतके जास्त आहे. एम्पॉवरमध्ये आमचे प्राथमिक व सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्य समस्यांविषयी बोलते करण्यासाठी आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी त्यांनी तज्ञांची मदत घेण्यात भिऊ नये यासाठी प्रोत्साहन देणे हे आहे. जास्तीत जास्त लोकांना सर्वसमावेशक मानसिक आरोग्य देखभाल सेवांचा लाभ मिळावा, मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचे निवारण करवून घेऊन सुखी व कार्यक्षम जीवन जगता यावे यावर एम्पॉवरच्या या पुणे सेंटरचा भर असणार आहे.”

महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि पुणे शहराचे माननीय पालकमंत्री श्री. अजित दादा पवार यांनी पुण्यामध्ये आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एम्पॉवर सुरु होत असल्याबद्दल शुभेच्छा व एक विशेष संदेश पाठवला आहे. त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे, “महाराष्ट्राचे आयटी हब असलेल्या पुण्यामध्ये एम्पॉवर – सेंटर सुरु केल्याबद्दल मी श्रीमती नीरजा बिर्ला, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल आणि एम्पॉवरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. लोकांमध्ये, खास करून युवा पिढीमध्ये आढळून येणाऱ्या मानसिक आरोग्य समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि त्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. बीएमसी एम्पॉवर हेल्पलाईन सुरु करणे असो किंवा मुंबई विमानतळावरील सीआयएसएफ अधिकाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य उपक्रम चालवणे असो, एम्पॉवरने महाराष्ट्रभरात अतिशय कौतुकास्पद कामे केली आहेत. मी शहरभरातील लोकांना आवाहन करतो की त्यांनी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील एम्पॉवरमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा.”

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ श्रीमती रेखा दुबे देखील यावेळी उपस्थित होत्या, त्यांनी सांगितले,”आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही परिपूर्ण आरोग्य देखभाल सेवासुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सुरुवातीपासून आम्ही शारीरिक उपचारांवर सर्वात जास्त भर दिला आहे. रुग्णांवर उपचार करत असताना आम्ही पाहतो आहोत की त्यांना बऱ्याच संघर्षांना सामोरे जावे लागत असते आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. हॉस्पिटलमध्ये एम्पॉवर सेंटर सुरु करण्यात आल्यामुळे आम्ही आमच्या रुग्णांना सर्वसमावेशक मानसिक आरोग्य देखभाल पुरवू शकू.”

पुणे सेंटर सुरु करण्यात आल्याच्या निमित्ताने एम्पॉवरने एम्पॉवर मेंटल हेल्थ स्कोर सर्व्हे देखील सुरु केला आहे. हा ऑनलाईन सर्व्हे असून यासाठी फक्त पाच मिनिटे वेळ लागतो. व्यक्तीला स्वतः दिलेल्या उत्तरांच्या आधारे स्वतःच्या मानसिक आरोग्याविषयी मूलभूत समज मिळावी हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. यातील प्रश्न दैनंदिन जीवन, वागणुकीच्या पद्धती, एकंदरीत जीवनशैली, सवयी इत्यादींशी संबंधित आहेत. हे सर्व प्रश्न तज्ञांनी तयार केले आहेत, लोकांना मानसिक आरोग्याविषयी मूलभूत माहिती मिळावी, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि गरज निर्माण झाल्यास लोकांना तज्ञांची मदत घेता यावी यादृष्टीने या सर्व्हेची रचना करण्यात आली आहे. सर्व्हेसाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करावे – http://mpowerminds.com/score

एम्पॉवरची सुरुवात २०१६ साली करण्यात आली, तेव्हापासून आजतागायत मुंबई, कोलकाता आणि बंगलोर याठिकाणी एम्पॉवर सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत. मुंबईमध्ये एम्पॉवर फाऊंडेशन आणि बिट्स पिलानी, बिट्स गोवा, बिट्स हैदराबाद व कल्याणमधील बिर्ला कॉलेजमध्ये एम्पॉवर सेल्स कार्यरत आहेत. अशाप्रकारे संपूर्ण देशभरात एम्पॉवर आपला कार्यविस्तार करत आहे. याखेरीज प्रोजेक्ट सक्षम, प्रोजेक्ट संवेदना, प्रोजेक्ट ऊर्जा, प्रोजेक्ट मन या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आणि दुःख व शोक प्रसंगी मदत करणाऱ्या समूहांमार्फत देखील एम्पॉवर समाजातील विविध वयोगटातील व विविध स्तरांतील लोकांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.