काश्मीरमधील ३७० कलम रद्द; लोकसभेत विधेयक मंजूर

0
465

नवी दिल्ली, दि.६ (पीसीबी) – राज्यसभेपाठोपाठ आज (मंगळवार) लोकसभेतही जम्मू-काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक मंजूर झाले. हे विधेयक ३६७ विरुद्ध ६७ मतांनी मंजूर करण्यात आले. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही राज्ये अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम ३७० मधील तरतुदी हटविण्याचा प्रस्तावही ३५१ विरुद्ध ७२ मतांनी मंजूर करण्यात आला आहे. हे विधेयक आणि प्रस्ताव राष्ट्रपतींकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे काश्मीर कलम ३७० मुक्त करण्याचे भाजपचे स्वप्न साकार झाले आहे.

आज सकाळी ११ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलमातील तरतूदी रद्द करण्याच्या प्रस्तावाबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे आणि जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचे विधेयक लोकसभेत मांडले. त्यावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अमित शहा यांनी उत्तरे दिली. त्यानंतर सायंकाळी सव्वा सात वाजता या विधेयकांवर मतदान घेण्यात आले.