काळेवाडी फाटा आणि डांगे चौकातील ग्रेडसेपरटर कामाची निविदा रद्द करा; भाजपच्याच नगरसेवकाची मागणी

0
962

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – काळेवाडी फाटा आणि थेरगावातील डांगे चौकात उभारण्यात येणाऱ्या ग्रेडसेपरेटर कामाच्या निविदेत ठेकेदार व अधिकाऱ्यांचे संगनमत झाले आहे. त्यामुळे या कामासाठी जादा दराची निविदा आली आहे. ही निविदा रद्द करून फेरनिविदा मागवावी, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शहरातील रस्ते, उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर आणि इतर कामांसाठी संबंधित विभागातील अधिकारी निविदा दर निश्चित करतात. निविदा प्रक्रियेत कमी दाराने आलेल्या निविदाधारकांकडून काम करून घेतले जाते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून विविध कामांसाठी जादा दराच्या निविदा भरल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या करदात्या नागरिकांचे नुकसान होत आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत काळेवाडी फाटा आणि थेरगावातील डांगे चौकात उभारण्यात येणाऱ्या नियोजित ग्रेडसेपरेटरच्या कामांतही करदात्यांचे नुकसान करण्याचा प्रकार निदर्शनास येत आहे.

या दोन्ही ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ग्रेडसेपरेटरसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. परंतु, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे या कामासाठी जादा दराच्या निविदा आल्या आहेत. जादा दराच्या निविदाधारकाला काम देण्याचे निश्चित झाल्यास महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. त्याची दखल घेऊन या दोन्ही कामाच्या निविदा रद्द करून फेरनिविदा मागवावी. तसेच या दोन्ही कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवलेल्या अधिकाऱ्यांची व त्यांच्याशी संगनमत असलेल्या ठेकेदारांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”