कामगार महिलेला कामावरून काढले म्हणून पतीची पत्नीकडे घटस्फोटाची मागणी

0
292

चिंचवडगाव,दि.20(पीसीबी) : कामगार महिलेला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला मारहाण करत तिचा छळ केला. तसेच तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. याबाबत विवाहितेने पती, दीर, सासू, सासरा आणि कामगार महिला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना सन 2010 पासून 19 सप्टेंबर 2020 या कालावधीत चाफेकर चौक, चिंचवडगाव येथे घडली आहे.

पती मिलिंद भिमाजी वडेर, दीर शैलेश भिमाजी वडेर, सासू नीलिमा भिमाजी वडेर, सासरा भिमाजी आत्माराम वडेर (सर्व रा. चाफेकर चौक, चिंचवडगाव), रोहिणी संजय खराटे (रा. निंबाळकर आळी, चिंचवडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहिणी फिर्यादी यांच्याकडे काम करत होती. आरोपी पती मिलिंद आणि रोहिणी यांचे विवाहबाह्य अनैतिक प्रेमसंबंध होते. मिलिंदला रोहिणी सोबत विवाह करायचा होता. मात्र फिर्यादी महिलेने रोहिणीला कामावरून काढून टाकले.

या कारणावरून आरोपींनी फिर्यादी विवाहितेचा छळ केला. लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी फिर्यादीला घरगुती कारणांवरून तसेच तू खालच्या जातीची आहे, असे म्हणून सतत शिवीगाळ व मारहाण केली. पती मिलिंद याने माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच रोहिलीला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून ‘तू घर सोडून जा, मला रोहिणी सोबत लग्न करायचे आहे’ असे म्हणून मिलिंद याने विवाहितेला त्रास दिला.

आरोपींनी कामगार महिलेला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करून तुझ्याकडे पाहून घेतो, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.