काँग्रेस येत्या १० सप्टेंबरला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता

0
278

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु आहे. काँग्रेस येत्या १० सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण ६० उमेदवारांचा समावेश असणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसकडून ३० विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मागील निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांनाही संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपले ७० उमेदवार निश्चित केल्याचे समोर येत आहे. काल पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही नावे निश्चित झाल्याचे समजत आहे.

शिवसेना-भाजप युतीचीही घोषणा येत्या दोन-चार दिवसात होईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. युतीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा पार पडली असून पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात युतीच्या फॉर्म्युल्याबाबत बैठक पार पडणार आहे. मात्र युतीच्या फॉर्म्युल्याचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्याचे बोलले जात आहे.