काँग्रेसने लहान मुलासारखे रडू नये – अरूण जेटली

0
367

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – काँग्रेस  वारंवार आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी करून लहान मुलांसारखे वागत आहे. त्यांनी अशा स्वरुपाची वागणूक  थांबवावी.  आदर्श आचार संहितेचे दाखले देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावता येणार नाही, असे सांगून काँग्रेसने लहान मुलासारखे रडू नये, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे.

अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये  म्हटले आहे की, आदर्श आचार संहिता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर अतिक्रमण करत नाही. राजकीय पक्षांनी विरोधकांच्या प्रत्येक विधानावर आदर्श आचारसंहिता उल्लंघनाचे आरोप  करण्याचा नवीन प्रकार सुरू केला आहे.  निवडणूक आयोगाकडे तक्रारी करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवे, की आचारसंहितेचा दाखला देऊन कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी केले जाऊ शकत नाही.

जेटली पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस  एका रडक्या लहान मुलाच्या भूमिकेत आहे. जो एका टोळक्याचे नेतृत्व करत आहे.  घटनेत प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र स्वरुपात भाषण देण्याचा अधिकार  आहे. ही कलम संविधानाचा अविभाज्य घटक आहे. त्यास संसद किंवा  न्यायालय सुद्धा कमी करू शकत नाही. निवडणुकीच्या वेळी सुद्धा हा अधिकार कमी होत नाही, असे ते म्हणाले.