प्रभाग अध्यक्षपदी भाजपचे बाबर, चिंचवडे, बोइनवाड, कदम, बुर्डे, नागरगोजे, बारणे आणि कांबळे यांची बिनविरोध निवड

0
646

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी (प्रभाग अध्यक्ष) भाजपचे नगरसेवक अनुक्रमे शर्मिला बाबर, करूणा चिंचवडे, यशोदा बोइनवाड, शशिकांत कदम, सुवर्णा बुर्डे, योगिता नागरगोजे, अर्चना बारणे आणि अंबरनाथ कांबळे यांची गुरूवारी (दि. ९) बिनविरोध निवड झाली.

महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी दरवर्षी नवीन अध्यक्ष निवडला जातो. निवडून आलेल्या नगरसेवकांमधून ही निवड होते. महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचा क्षेत्रीय किंवा प्रभाग अध्यक्ष निवडला जातो. सध्या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे २०१७ पासून प्रत्येक वर्षी भाजप आणि पाठिंबा दिलेल्या अपक्ष नगरसेवकांना प्रभाग अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे.

प्रभाग अध्यक्ष निवडीचे हे तिसरे वर्ष आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. आठ प्रभागांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शनिवारी (दि. ४) दुपारी पाच वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीत आठही प्रभागांच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या आठ नगरसेवकांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज सादर केला होता. अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध निश्चित झाली होती. गुरुवारी (दि. ९) अध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडी जाहीर केल्या.

त्यानुसार “अ” क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदी भाजपच्या शर्मिला बाबर, “ब” क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी भाजपच्याच करुणा चिंचवडे, “क” क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी यशोदा बोइनवाड, “ड” क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी शशिकांत कदम, “इ” क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी सुवर्णा बुर्डे, “फ” क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी योगिता नागरगोजे, “ग” क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी अर्चना बारणे आणि “ह” क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी अंबरनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.