कराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला

0
915

पाकिस्तान, दि. २३ (पीसीबी) – पाकिस्तानमधील कराची येथे चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. सुदैवाने या हल्ल्यात चीन दुतावासातील अधिकारी आणि कर्मचारी सुखरुप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कराचीतील क्लिफ्टन ब्लॉक – ४ येथे चीनचे दुतावास आहे. शुक्रवारी सकाळी तीन दहशतवाद्यांनी दुतावासात घुसण्याचा प्रयत्न केला. एका कारमधून हे तिन्ही दहशतवादी दुतावासाच्या आत घुसण्याच्या प्रयत्नात होते. दुतावासाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी ही कार थांबवण्याचा प्रयत्न केला. इतक्यात कारमधील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तिन्ही दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. कारमध्ये स्फोटक पदार्थ मोठ्या प्रमाणात होते. पोलिसांनी शस्त्रसाठा आणि बॉम्ब जप्त केले आहेत. या घटनेनंतर चीन दुतावासाबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.