चाकणमध्ये गावठी पिस्टलसह दोघांना अटक

0
1162

चाकण, दि. २३ (पीसीबी) – दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. ही कारवाई चाकण पोलीस ठाण्यातील पथकाने गुरुवारी (दि.२२) चाकण पोलीस ठाणे हद्दीतील खालुंब्रे शिवारातील हुंदाई कंपनीसमोर केली.

आकाश भगवान हुरसाळे (वय २५, रा. मंदोसी ता. खेड) आणि त्याचा साथीदार ऋषीकेश दिलीप कलाटकर (वय २१, रा. कोरेगाव बुद्रुक, खेड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी या दोघांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी चाकण पोलीसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, खालुंब्रे शिवारातील हुंदाई कंपनीसमोर एक इसम पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आकाश आणि ऋषीकेश या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता आकाशकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस तर त्याचा साथीदार ऋषीकेश याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन आकाश आणि ऋषीकेश या दोघांना अटक केली. चौकशी दरम्यान या दोघांनी हे पिस्टल बिहारहून विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे. तर आकाश याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, शिवानंद स्वामी, संदिप सोनवणे, संजय जरे, हनुमंत काबंळे, निखील वर्पे, मच्छिंद्र भांबरे यांच्या पथाकने केली.