औद्योगिकनगरीत बुधवार ठरला  घातवार; वेगवेगळ्या घटनात ९ जणांचा मृत्यू

0
548

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – औद्योगिकनगरीत  बुधवार (दि.२०) हा दिवस  घातवार ठरला. शहरात एकाच दिवसात वेगवेगळ्या घटनामध्ये ९ जणांचा मृत्यू  झाला. अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर आत्महत्या करून ३ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर खून प्रकरणात एकाचा मृत्यू झाला. शहरातील वाढती लोकसंख्या, ताणतणाव, स्त्री अत्याचार आणि बेशिस्त वाहतूक या बाबी मृत्यूच्या घटनांना कारणीभूत ठरल्याचे अधोरेखित झाले आहे.  

बुधवारी पहाटेच्या सुमारास दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिजित काटकर (वय ४०, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसरी घटना मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे घडली. येथे पती सुनिल शिंदे याने गरोदर पत्नी अनिता शिंदे हिचा चाकूने वार करुन खून केला. तिसऱ्या घटनेत मोशी येथे विनोद पाटील (वय २१, रा. तुपे वस्ती, मोशी) या तरुणाने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौथ्या घटनेत दुपारच्या सुमारास पिंपळे गौरव येथील महादेवाच्या मंदिराचा सभामंडप कोसळला आणि त्यामध्ये सिध्दाम्मा पुजारी, मानतोष दास आणि प्रेमचंद राजवार या तीन कामगारांना आपले प्राण गमावावे लागले. तर ९ ते १० जण गंभीर जखमी झाले होते.

पाचवी घटना ही केएसबी चौकातील उड्डाण पुलावर घडली. येथे भरधाव डंपरने ओंकार मोरे (वय १९)  या तरुणाला चिरडले. या घटनेनंतर  संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला. सहाव्या घटनेत पिंपरीतील खराळवाडीत येथे वर्षा जगताप नावाच्या तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. तर सातव्या घेतनेत मोरवाडी येथे इस्माईल शेख या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा प्रकारे बुधवारी एकाच दिवशी विविध घटनेत शहर परिसरातील एकूण ९ जणांनी आपले प्राण गमावले. या घटनांमुळे हळहळ व्यक्त होत  आहे. वाढती लोकसंख्या, ताणतणाव, स्त्री अत्याचार आणि बेशिस्त वाहतूक या  बाबी मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.