‘ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नाही तो पर्यंत राज्यात निवडणुका होऊ नये’

0
248

मुंबई, दि.०१(पीसीबी) : सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण अखेर रद्द ठरवल्यानंतर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण दिसत आहे. यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे पाठोपाठ आता काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही हा आरक्षणाचा तिढा सुटत नाही तो पर्यंत राज्यात निवडणुका होऊ नये, अशी भूमिका व्यक्त केलीय. तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय.

दरम्यान, वडेट्टीवार म्हणाले कि, ‘4 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता. त्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले होतं. त्यानंतर आता राज्य सरकारची पुनर्विचार याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलंय. या पार्श्वभूमीवर वेगळा आयोग स्थापन करुन ओबीसींची जनगणना करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केलीय. एसटी, एससी आणि ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असं न्यायालयानं म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जनगणना सुचवल्यानंतर आता जनगणनेला विरोध होऊ नये. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जोपर्यंत रिस्ट्रक्चर होणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण मिळणार नाही. मी सरकारमध्ये मंत्री असलो तरी हा तिढा सुटेपर्यंत राज्यात निवडणुका होऊ नयेत, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. सरकारने मनात आणलं तर महिनाभरातही जनगणना होऊ शकते. केंद्र सरकारकडे जनगणनेची आकडेवारी आहे. मात्र, ते जाहीर करत नाहीत. केंद्र सरकारची विचारधानार नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिली असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केलीय.