ओंजळीतून सांडण्यापूर्वीच ते समाजासाठी द्या; नाना पाटेकरांचा संदेश

0
654

जालना, दि. ८ (पीसीबी) – आपल्या ओंजळीत जेवढं मावतं तेवढंच घ्या, त्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न केला तर ते सांडतं व मातीत मिसळतं. त्यापूर्वीच ते समाजासाठी दिलं तर त्याचा सदुपयोग होईल. परंतु त्याचा तमाशा करू नका व श्रेय घेण्याचाही प्रयत्न करू नका. कारण ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सामुहिक विवाह सोहळा त्याचाच एक भाग आहे. मला मुलगी नाही परंतु या सोहळ्यातून ४८ मुलींचे कन्यादान करण्याचे समाधान मिळाले. शिवाय मुलगा मल्हार याचेही लग्न सामुहिक विवाह सोहळ्यातूनच करणार असल्याचे अभिनेते नाना पाटेकर यांनी जाहीर केले. ते शहरात आयोजित सामुहिक विवाह सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

भाईश्री फाउंडेशन व नाम फाउंडेशनच्या वतीने शहरातील दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ४८ जोडपी विवाह बंधनात अडकले. याप्रसंगी वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी शेष महाराज गोंदीकर, नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, रमेशभाई पटेल, भावेशभाई पटेल, ताराबेन पटेल, टी बोर्डाचे उपाध्यक्ष जयदीप बिस्वा, नवनाथ येवले, राजीव सावंत, मकरंद देशपांडे आदींची उपस्थिती होती. विवाह सोहळ्याप्रसंगी अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, भाईश्री रमेशभाई पटेल यांनी प्रत्येक वधाू-वरांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सामुहिक विवाहासारख्या उपक्रमांना मदत करणे म्हणजे कुणावर उपकार नाही तर आपण समाजाचं देणं लागतो आहे. आपल्याकडे जे आहे ते इतरांकडे नाही तर त्यांना ते देणं आपली जबाबदारी आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून होणारे कामे समाजाला व सरकारलाही आवडत असेल तर आम्हाला कोणताही पुरस्कार देऊ नका. मात्र सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी पुढे, या असे आवाहनही नाना पाटेकर यांनी केले.

आम्ही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत २९ शीर्षकाखाली कामे केली आहेत. मुलीच्या लग्नाची काय चिंता असते हे तिच्या आई-वडिलांशिवाय कुणाला समजू शकत नाही. त्यांची हीच चिंता दूर करण्यासाठी आम्ही अशा प्रकारच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. राज्यात आतापर्यंत ३२०० विवाह सोहळ्यात नाम फाऊंडेशनचे अंशत: का असेना योगदान आहे, याचे समाधान असल्याचे अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले. २००१ पासून गुजरात येथे हा सोहळा होत होता. मात्र मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेत जालना येथे हा सातवा विवाह सोहळा संपन्न होतो आहे. यात जालनेकर दानशूरांचे मोठे योगदान असल्याचे भाईश्री पटेल यांनी सांगीतले.

तांदूळ नाही तर फुलांच्या अक्षता

या सोहळ्यासाठी अक्षता म्हणून किमान शंभर किलो तांदळाचा वापर करावा लागला असता. मात्र ते तांदूळ वाया जातात ही बाब लक्षात घेऊन त्याऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. वाचलेले शंभर किलो तांदूळ आणि त्यात आणखी एक हजार किलो तांदळाची भर टाकून ११०० किलो तांदूळ मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांना सुपूर्द करण्यात आले. सोहळ्याचे अत्यंत नेटके आयोजन करण्यात आले. त्यासाठी भव्य खुला शामियाना मंडप, वधू-वरांच्या नातेवाइकांना थांबण्यासाठी स्वतंत्र जागा दिली गेली.

नानाचा साधेपणा

पांढरा कुर्ता, पायजमा आणि डोक्यावर मराठमोळा फेटा अशा पेहरावात नाना उपस्थित होते. प्रत्येक वधू-वरांशी त्यांनी चर्चा केली. नानांचे मनोगत संपले तेव्हा उपस्थितांपैकी काहींनी चित्रपटातील एखादा डायलॉग सादर करा अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र नानांनी नम्रपणे नकार दिला. हक्काचे मूठभर पाणी आभाळांने आपल्याला द्यावं, ते जर दिले तर सरकारकडे काहीच मागायचं नाही असे अर्जव केले.