ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक म्हणाले “भारतीय क्रिकेटपटूंना कधीही कमी समजू नका, कारण…”

0
426

ऑस्ट्रेलिया,दि.१९(पीसीबी) – ऑस्ट्रेलियन संघ नवख्या भारतीय संघाकडून पराभूत झाला. याबद्दल ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांना मत विचारण्यात आलं. त्यांनीही अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं. “ही कसोटी मालिका अतिशय चुरशीची झाली. सामना म्हटला की कोणीतरी हारणार कोणीतरी जिंकणार. पण एक नक्की की कसोटी क्रिकेटचा आज विजय झाला. भारतीय खेळाडूंना या विजयाचं पूर्ण श्रेय दिलंच पाहिजे. त्यांनी अप्रतिम खेळी करून दाखवल्या. त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखं खूप काही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीयांना कधीही कमी समजू नये हे आम्हाला समजलं. कारण १.५ बिलियन इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशातून जर ११ लोकं खेळत असतील तर ते नक्कीच सर्वोत्तम ११ खेळाडू असणार हे आम्हाला आज पटलं”, अशी कबुली त्यांनी दिली.

दरम्यान “ऋषभ पंतच्या खेळीने मला खूप प्रभावित केलं. पंतच्या खेळीमुळे मला बेन स्टोक्सची खेळी आठवली. पंत निर्भीडपणे आव्हानाला सामोरा गेला. सलामीवीर शुभमन गिलने दमदार कामगिरी करून दाखवली. तुम्ही कधीही कोणालाही गृहित धरू शकत नाही. आमच्या संघातील चारही गोलंदाज अनुभवी होते. पण हेच चार गोलंदाज चारही सामन्यात गोलंदाजी करताना दिसले. त्यांना फारशी विश्रांती मिळू शकली नाही. पण तरीदेखील विजयाचं श्रेय हे पूर्णपणे भारतीय संघाचंच आहे”, असं लँगर म्हणाले.