ऑक्टोबरमध्ये ११ दिवस राहणार बँका बंद

0
461

मुंबई, दि. ३० (पीसीबी) दिवाळी आणि दसऱ्या या सणांमुळे पुढील महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये बँकेची कामासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. ११ दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी, गोवर्धन पुजा आणि भाऊबीज यांसारखे सण आले आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस आणि चौथ्या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. सहा ऑक्टोबरला रविवार, सात ऑक्टोबरला महानवमी आणि ८ ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्यातील चौथा शनिवार असल्याने २६ ऑक्टोबरला बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. दिवाळीला रविवारी (२७ ऑक्टोबर) सुरुवात होणार असून, २८ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे. २९ ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँका बंद राहणार आहेत.

जर तुमचे बँकेचे कुठले काम अडकून पडले असेल, तर आधीच करुन घ्या, नाहीतर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सर्वसामान्यांनी बँकाची कामे करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. बँका बंद राहणार असल्यामुळे त्याचा भार एटीएमवर पडू शकतो.