बांधकामाचे करोडो रुपये न देता हॉटेल व्यावसायिकाची ‘अशी’ शक्कल वापरत फसवणूक

0
250

चाकण, दि. ३१ (पीसीबी) – खरेदी केलेल्या रूम, शॉप आणि पार्किंगचे उर्वरित काम खरेदीदाराने करून घेतले. त्या कामाचे पैसे बांधकाम व्यावसायिकाची कंपनी देणार असल्याचे ठरले होते. मात्र, कंपनीने आश्वासित केलेले पैसे न देता खरेदीदार हॉटेल व्यावसायिकाची एक कोटी ६० लाखांची फसवणूक केली. ही घटना निघोजे येथे १६ नोव्हेंबर २०१५ ते ३ मार्च २०२० या कालावधीत घडली. याबाबत ३० मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश अंतय्या शेट्टी (वय ५१, रा. कलिना सांताक्रूझ ईस्ट, मुंबई) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज किशोरीलाल चड्डा, गुरमील सिंग, कल्पनासिंग उधे, शिवाजी रामलिंग साखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी जी डी एस बिल्डकॉन प्रा ली व त्यांचे संचालक आरोपी यांच्याकडून ६६ रूम, तीन शॉप आणि १० पार्किंग खरेदी केल्या आहेत. त्याचे अपूर्ण काम फिर्यादी यांनी पूर्ण केले. त्या कामाचे पैसे आरोपी देणार असल्याचे ठरले होते. मात्र आरोपींनी फिर्यादी यांना ठरलेली रक्कम दिली नाही. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना विकलेल्या मिळकतीवर कर्ज काढले होते. ते कर्ज न फेडल्यामुळे बँकेकडून फिर्यादी यांना जप्तीची नोटीस आली आहे. आरोपींनी एकूण एक कोटी ६० लाख २७ हजार ९८४ रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.