“एकही खासगी बस राज्यात चालवू देणार नाही”: हाजी अराफात यांचं आव्हान

0
282

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा मागील आठवड्याभरापासून बेमुदत संप सुरु आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही एसटी कर्मचाऱ्यांसोबत ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर हाजी अराफात यांनीही आता ठाकरे सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना आव्हान दिलंय. आजपासून भाजप नव भारतीय शिववाहतूक युनियन एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उतरणार असल्याची घोषणाच अराफात यांनी केलीय.

अनिल परब एसटी कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. मराठी भूमिपुत्रांना आंदोलन करावं लागत आहे. भाजप नव भारतीय शिववाहतूक युनियन या आंदोलनात उतरणार आहे. सात लाख बसेस आहेत. ही सगळ्यात मोठी संघटना आहे. आजपासून खासगी बसेस आम्ही बंद करत आहोत. राज्यात खासगी युनिनयच्या बसेस बंद करणार. केवळ नॅशनल परमिट असलेल्या बसेस चालणार आहे. राज्यातील खासगी बसेस जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बंद राहणार, असा इशारा हाजी अराफात यांनी दिलाय. एकही खासगी बस राज्यात चालवू देणार नाही, असं आव्हानच हाजी अराफात यांनी दिलंय.

अनिल परब माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी पडळकर आणि खोत यांच्याशी दोन वेळा बोललो आहेत. त्यांच्यासमोर सरकारचे प्रस्ताव ठेवले आहेत. ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील. नाहीतर कामगार त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील. मात्र, सर्वांसाठी चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन परब यांनी केलंय.

दरम्यान, एसटी कमर्चाऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं आहे. काळ्या पायाचं हे सरकार आहे. अनेक संकटाच्या काळात या सरकारने काहीही मदत केली नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या ऐकून घ्याव्या. त्यांना काय देता येईल, काय देता येणार नाही याबाबतही चर्चा करावी. अन्यथा हेच एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिलाय.