एकनाथ खडसे संतापले, काय म्हणाले वाचा …

0
438

जळगाव, दि. १३ (पीसीबी) – “मार्चमध्येच आमच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, तर मग ही फसवणूक का केली?,” असा सवाल भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला केला आहे. विधानसभा निवडणुकीत डावलण्यात आल्यानंतर खडसे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं भाजपा पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं. विधान परिषदेसाठी विचार व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. तसं त्यांना आश्वासनही मार्चमध्येच देण्यात आलं होतं. पण, भाजपानं घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये अनपेक्षित नावं जाहीर झाल्यानं ते राज्यातील भाजपा नेत्यांवर चांगलेच संतापले आहेत. काँग्रेसकडून ऑफर होती असा गैप्यस्फोटही त्यांनी केला आहे. हे असेच सुरू राहिल तर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्यात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपानं चार उमेदवार जाहीर केले असून, निष्ठावंतांना संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू असताना भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भाजपाच्या या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली असून, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यातील नेत्यांवर कडाडून टीका केली आहे.
खडसे म्हणाले, “स्वतःकडे ज्यावेळस अधिकार येतात तेव्हा संघटनेला विश्वासात न घेता, मी पक्ष चालवतो, अशी भावना निर्माण होते. तेव्हा पक्षाची अशी वाताहत होते. आज भाजपाचं जे चित्र आहे, ते सामूहिक नाही. संघटित नाही. एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतले जात नाही. एखाद्यावेळी तर ते देखाव्यापुरते दाखवले जातात. प्रदेश कार्य समितीच्या बैठका झाल्या, तर त्यामध्ये दोन तीन भाषणं होतात, पण कुणाला बोलू दिलं जात नाही. असे अनेक विषय आहेत. हे पक्षातंर्गत विषय आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालणार आहोत. अशानं कसा पक्ष वाढेल? इथं बहुजन समाजाच्या नेतृत्वाचं जर खच्चीकरण करत असाल, अशी विचित्र वागणूक जर मिळत असेल, तर पक्षाच्या वरिष्ठांकडे हे मांडण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. पक्षाचा विस्तार होईल, यापेक्षा एखाद्या व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा विकास होईल, अशा स्वरूपाचं वातावरण आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे. एखाद्या कुठल्यातरी व्यक्तीची हुकुमशाही चालवून घ्यायची आणि त्यांनीच निर्णय घ्यायचे. वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे स्वतः सर्वस्वी समजायचं, हे जे भाजपात सुरू आहे. लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही,” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
“विधान परिषद निवडणुकीसाठी नावांची शिफारस केल्याचं मार्चमध्येच का सांगण्यात आलं. मार्च आम्हाला सांगितलं नसतं की तुमच्या नावांची शिफारस नाही. ही सगळी फसवणूक आहे. पक्ष वाढला पाहिजे, हे आता सांगतात. आम्ही जिवाचं रान करून आज हा पक्ष आज जो झालेला आहे, तो आमच्या ताकदीनं, मेहनतीनं आणि आमचा खारीचा वाटा होता म्हणून झालेला आहे. यांचं काय योगदान आहे पक्षामध्ये? कितीवेळा हे तुरूंगात गेले? कितीवेळा दगड खाल्ले? आम्ही सायकलवर फिरलो. हमालासारखं फिरलो. कित्येक वर्ष तुरूंगात काढली. त्या हालअपेष्टांना पक्षामध्ये काही किंमत आहे की नाही? यांच्या सामाजिक समीकरणामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे बसत नव्हते का? जुन्या माणसांचा जेवढा जनाधार आज आहे, तेवढा नवीन माणसांचा जनाधार आहे का? वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीनं उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचं वाईट वाटतं. विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही,” असा घणाघाती हल्ला एकनाथ खडसे यांनी भाजपा राज्यातील नेत्यांवर केला.