उधारीवर सिगारेट न दिल्याने पुनावळ्यामध्ये टोळक्यांनी दुकानदाराच्या घरात घुसून केली तोडफोड

0
735

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – उधारीवर सिगारेट न दिल्याने तसेच पोलीसात तक्रार केल्याच्या कारणावरुन सहा जणांच्या टोळक्यांनी रात्री उशीरा एका दुकानदाराच्या घरात घुसून तोडफोड करत चोरी केली. या घटने दरम्यान दुकानदाराने परिवारासह स्वत:ला एका खोलीत कोंडून घेत प्राण वाचवले. ही थरारक घटना सोमवारी (दि.२२) रात्री साडेअकराच्या सुमारास पुनावळे येथे घडली.  

याप्रकरणी दुकानदार सागर भरत बोरगे (वय २८, रा. बोरगेवाडा, पुनावळे) यांनी वाकड पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानुसार सुधीर शिवाजी लिमकर (वय २६, रा.बौध्द विहाराजवळ, ओव्हाळ वस्ती, पुनावळे), अमित दत्तात्रय पाटोळे (वय १९, रा. शिंदेवस्ती चौक, रावेत), योगेश संजय धुमाळ (वय २५, रा. पुनावळे गावठाण), सुरज उर्फ टिंकू राकेश मिश्रा (वय २०, रा. भुजबळ चौक, पुनावळे), तुकाराम आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार असे एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर यांचे पुनावळे येथे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी (दि.२१) रात्री आरोपी सुधीर याने सागर यांना उधारीवर सीगारेट मागीतली. मात्र सागर याने ती देण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. यामुळे सागर यांनी सुधीर विरोधात वाकड पोलीसात तक्रार दाखल केली.

सोमवारी (दि.२२) रात्री सागर हे त्यांच्या घरी झोपले असताना आरोपी सागर याने त्याचे साथीदारांसह मिळून हातात तलवारी, कोयते घेऊन दरवाजावर लाथा मरुन दरवाजा तोडला. यामुळे घाबरलेले बोरगे कुटूंबीयांनी घरातील एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतले. यादरम्यान आरोपींनी घराचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील सामानाची तोडफोड करुन घरातील साडेचार हजार रुपये ठेवलेले पैशांचे पाकिट चोरुन नेले. आरोपींचा राग येवड्यावरच थांबला नाही त्यांनी बोरगे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या पाच ते सहा वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करुन पसार झाले. घटनेबाबत वाकड पोलीसांना माहिती देण्यात आली त्यांनी तातडीने सुधीर, अमित, योगेश आणि सुरज या चौघांना अटक केली तर इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. वाकड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.