“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर…”

0
716

मुंबई, दि.२८ (पीसीबी)- विधानसभा निवडणुकीचा २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात सुरु झालेला सत्ता स्थापनेच्या पेचाला आज पूर्णविराम मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगत आहे. राजकीय वर्तुळापासून ते कलाविश्वापर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मते व्यक्त करत आहेत. यामध्ये स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खाननेदेखील त्याचे मत व्यक्त करत ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले’ तर राज्यात काय होईल हे सांगितले.

केआरकेने ट्विटरवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी ट्विट करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “जर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर येथील जनतेचं ते भाग्यच असेल”, असे केआरकेने म्हटले आहे.

पुढे तो म्हणतो, “उद्धव ठाकरे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई प्रत्येकाला समान वागणूक देतात. त्यांच्यादृष्टीने सारे एकसमान आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे असले तरीदेखील त्यांचे विचार अत्यंत आधुनिक आणि नवे आहेत. तेच एकमेव असे नेता आहेत, ज्यांच्यामुळे माझा देशद्रोही चित्रपट मुंबईमध्ये प्रदर्शित होऊ शकला. त्यांच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक व्यक्ती समान आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले तर राज्यातील नागरिकांचे ते भाग्यच ठरणार आहे”.

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. तसेच उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.