ईडी च्या ९५ टक्के केसेस विरोधीपक्ष नेत्यांवर

0
176

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – ‘भाजप नेत्यांकडून दररोज विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवली जात आहे. मात्र, मला वाटत नाही की यामागं पंतप्रधान मोदी आहेत. असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं. दरम्यान, ईडी संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. २०१४ मध्ये केंद्रात भाजपचं सरकरा आल्यापासून ईडीच्या केसेसमध्ये चारपटीने वाढ झाली असून विशेष बाब म्हणजे राजकारणातील केसेसमध्ये ९५ टक्के केसेस विरोधीपक्ष नेत्यांवर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ पासून १२१ नेत्यांची चौकशी झाली आहे. यातील ११५ नेते कोणत्या ना कोणत्या विरोधी पक्षामधील आहेत. यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो काँग्रेसचा. सर्वाधिक ईडीच्या केसेसमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश असून २०१४ पासून काँग्रेसच्या २४ नेत्यांची चौकशी झाली आहे. तर तृणमुलचे १९ नेते ईडीच्या फेरीत अडकले आहेत. तिसरा क्रमांक यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा लागतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षातली ११ नेते ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत.

काँग्रेसच्या काळामध्ये केवळ २००४ ते २०१४ दरम्यान, केवळ २६ नेत्यांची ईडीची चौकशी झाली. त्यामधील १४ नेते हे विरोधी पक्षातील होते.2014 मध्ये केंद्र सरकारमध्ये भाजप सत्तेत आलं. 2014 ते 2022 या मोदी सरकाच्या कार्यकाळात ईडीच्या कारवाया वाढल्याचं चित्र आकडेवारीतून दिसून आलं आहे. ईडीनं मोदींच्या कार्यकाळात विविध केसेमध्ये 2974 छापे टाकले आहेत. तर, 839 तक्रारीअंतर्गत 95 हजार 432 कोटी रुपयांच्या गैरप्रकारांची चौकशी सुरु असल्याची माहिती लोकसभेत सादर करण्यात आली आहे.

ईडीनं 2005 पासून आतापर्यंत पीएमएलए कायद्यांतर्गत एकूण 3086 छापे टाकण्यात आले आहेत. त्यासंदर्भात 4964 ईसीआयर दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणापैकी 943 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ईडीच्या कारवायांमध्ये आतापर्यत 23 जण दोषी आढळले आहेत.