आशिष शेलार, राज ठाकरे यांच्यात कृष्णकुंजवर खलबते

0
1083

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – मुंबई भाजपचे  अध्यक्ष आशिष शेलार यांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती असून ही बैठक घरगुती स्वरुपाची असल्याचे सांगितले जात आहे.  तरीही त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाली असावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

राज यांचे पुत्र अमित यांच्या लग्नाला भाजपकडून कोणाला बोलवायचे, यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. २७ जानेवारीला दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातील ‘सेंट रेजिस’मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. प्रसिद्ध बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मितालीसोबत अमित विवाहबंधनात अडकणार आहेत.

आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये  तब्बल २ तास  बैठक चालली  होती. व्यक्तिगत गप्पांसोबत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. याआधीही राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये अनेकदा बैठका झाल्या आहेत.