आळंदीत कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

0
392

आळंदी, दि. २२ (पीसीबी) – भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरचालकाने रस्त्याने पायी चाललेल्या एका ५७ वर्षीय महिलेला जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.२१) दुपारी पावनेतीनच्या सुमारास आळंदी येथील माहेश्वरी भक्त निवास समोर प्रदक्षणा रोडवर घडली.

गंगुबाई रामचंद्र भीसे (वय ५७, रा. खोजापुरी, अहमदनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकणी आळंदी पोलीस ठाण्यात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावनेतीनच्या सुमारास गंगुबाई या आळंदी येथील माहेश्वरी भक्त निवास समोरील प्रदक्षणा रोडवरुन पायी चालल्या होत्या. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या (एनएल/०१/एए/३१३७) या क्रमांकाच्या कंटेनर चालकाने गंगुबाई यांना जोरदार धडक दिली आणि कंटेनरसह पसार झाला. या घटनेत गंगुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जलद गतीने कंटेनरचा शोध घेऊन पोलीसांनी कंटेनर चालकाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक लोहेकर तपास करत आहेत.