आरेतील २ हजार ११ झाडे तोडण्यासाठी तब्बल २ कोटी ७० लाखांचा खर्च

0
415

मुंबई, दि.१४ (पीसीबी) –आरेतील मेट्रो कारशेडसाठी ४ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये तब्बल २ हजार ११ झाडे तोडण्यासाठी आली. यासाठी तब्बल २ कोटी ७० लाखांचा १६ हजार ८९८ रुपयांचा खर्च आल्याची माहिती समोर आली आहे. याचा अर्थ एक झाड तोडण्यासाठी १३ हजार ४३४ रुपयांचा खर्च आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी यासंदर्भातील माहितीची एमएमआरसीएलकडे माहिती अधिकारात विचारणा केली होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरेमध्ये ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान मेट्रोच्या कारशेडसाठी दोन हजारहून अधिक झाडं कापण्यात आली. या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा आधीपासूनच विरोध होता. त्यात मध्यरात्री अचानक झाडांची कत्तल करण्यात आल्यानं पर्यावरणप्रेमींनी सरकारला धारेवर धरलं. या वृक्षतोडीसाठी आलेल्या खर्चाची माहिती भंडारेंनी एमएमआरसीएलकडे मागितली होती. तीन दिवसांमध्ये तोडलेल्या दोन हजार अकरा झाडांसाठी एकूण २ कोटी ७० लाख १६ हजार ८९८ रुपयांचा खर्च आल्याची आकडेवारी भंडारेंना एमएमआरसीएलनं दिली.

माहिती अधिकाराच्या केलेल्या अर्जाला महिन्याभरात उत्तर देणं अपेक्षित असतं. मात्र या प्रकरणात एमएमआरसीएलनं टाळाटाळ केली. भंडारेंनी केलेला अर्ज एमएमआरसीएलला १५ ऑक्टोबरला मिळाला. मात्र याचं उत्तर भंडारेंना ९ डिसेंबरला मिळालं. विशेष म्हणजे हे उत्तर पोस्टानं पाठवण्यात आलं नाही. ते भंडारेंनी स्वत: स्वीकारलं. महिन्याभरात अर्जाला उत्तर न मिळाल्यानं दरम्यानच्या काळात भंडारेंनी अपीलदेखील केलं. अखेर ९ डिसेंबरला त्यांना उत्तर मिळालं. मात्र त्यावर ११ नोव्हेंबरची तारीख असल्यानं भंडारेंनी आश्चर्य व्यक्त केलं. या सर्व घटनाक्रमामुळे एमएमआरसीएलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.